बुलडाणा- अवैध व्यवसाय करण्यासाठी कोण काय शक्कल लढवेल याचा काही नेम नाही. भाजीपाला वाहतूक करणाऱ्या एका वाहनात गुप्त कप्पे तयार करून त्यातून दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने काल रात्रीच्या सुमारास अटक केली. त्यांच्या ताब्यातून ४७ दारूचे बॉक्स जप्त करण्यात आले आहेत.
दारूची वाहतूक करण्यासाठी महिंद्रा पिकअपमध्ये एका विशिष्ट प्रकारे गुप्त कप्पे तयार करण्यात आले होते. दर्शनी भागात भाजीपाल्याचे रॅकेट ठेवत त्याच्या आडून राजरोसपणे अवैध दारूची वाहतूक केल्या जात होती. मात्र स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने या षडयंत्राचा पर्दाफाश करत अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
बुधवारी 5 फेब्रुवारीला रात्रीच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेला अवैध दारू वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने येथील एसबीआय बँक चौकात सापळा रचला असता महिंद्रा पिकअप वाहन क्रमांक एमएच १४ ए एच १९५ भरधाव वेगात जात असल्याचे पथकांच्या संशयावरून निदर्शनास सदर आले. वाहनाला थांबवून वाहनांची तपासणी केली असता त्यात भाजीपाल्याचे रिकामे कॅरेट असल्याचे दिसून आले. वरून वाहनांची पूर्ण तपासणी केल्यानंतरही दारू कुठेच मिळून आली नाही. त्यामुळे पथकाने गाडीतील सर्व सामान खाली काढून गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये तयार करण्यात आलेल्या गुप्त कप्प्यात देशी दारूचे बॉक्स मिळून आले.
याप्रकरणी वाहन चालक दयानंद अभिमान शिरसाठ (वय ३४ वर्ष) व सोमनाथ नाना कोळी (वय ३३ वर्ष, दोघेही राहणार खामखेड ता. शिरपूर जिल्हा धुळे) यांना दारूची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून देशी दारूचे तब्ब्ल ४७ बॉक्स व वाहन असा मिळून ४ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जपत करण्यात आला आहे. सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनात सपोनि पांडुरंग इंगळे, राजेंद्र क्षीरसागर, पोकॉ. केदार फाळके आदींनी ही धडाकेबाज कारवाई केली.