बुलडाणा - राज्यामध्ये सत्तांतर झाले आहे. त्याचे पडसाद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही उमटले आहेत. मंगळवारी जिल्ह्यात पार पडलेल्या पंचायत समिती सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुकीत १३ पैकी ६ पंचायत समितीवर महाविकास आघाडी, तर ६ पंचायत समितीवर भाजपला संधी मिळाली. तसेच देऊळगाव राजा येथे आरक्षित पदाचा उमेदवार नसल्याने ही जागा रिक्त राहिली आहे. मात्र, त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा उपसभापती झाला आहे.
विशेष म्हणजे १० जागांवर महिला सभापती झाल्या, तर ७ जागांवर उपसभापती पद महिलांना मिळाले आहे. बुलडाणा पंचायत समिती येथे महाविकास आघाडीकडून काँग्रेच्या उषा चाटे सभापती, तर शिवसेनेच्या अरुणा पवार उपसभापतीपदी निवडून आल्या. लोणार पंचायत समितीमध्ये महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीच्या वर्षा इंगळे सभापती, तर उपसभापती म्हणून शिवसेनेचे डॉ. हेमराज लाहोटी यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळीही तिसऱ्यांदा महिला सभापती झाल्याचा बहुमान लोणार पंचायत समितीला मिळाला आहे. मोताळ्यामध्ये काँग्रेसचे कैलास गवई सभापती, तर शिवसेनेच्या राजेश्वरी कुंवरसिंग परमार यांची उपसभापतीपदी निवड झाली.
चिखलीमध्ये भाजपने एकहाती दोन्ही जागा मिळवल्या. बहुमताच्या कौलसह ईश्वरीचिठ्ठीचा कौल भाजपच्या बाजूने लागल्याने चिखली पंचायत समितीवर प्रदीर्घ कालावधीनंतर भाजपच्या सिंधु अंकुश तायडे सभापती, तर शमशादबी शाहेद पटेल पहिल्या मुस्लीम उपसभापती बनल्या आहेत.