बुलडाणा - खामगाव तालुक्यातील वाडी या खेड्यातून येणाऱ्या प्रसाद ठाकरे या तरुणाने पहिल्याच प्रयत्नात न्यायाधीश पदाला गवसणी घातली आहे. राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) परीक्षेत त्याने यश संपादन केले. विशेष बाब म्हणजे प्रसादला बारावीमध्ये अवघे 51 टक्के गुण मिळाले होते. म्हणून त्याने 3 वर्षे शेतीही केली. मात्र, कर्जाचा डोंगर झाल्याने त्याने न्यायाधीश पदाची परीक्षा दिली. प्रसादच्या जिद्द आणि चिकाटीचे कुटुंबीय व गावकऱ्यांकडून भरभरून कौतुक होत आहे.
हेही वाचा - #१५YearsofDhoni : पहिल्याच सामन्यात झाला होता शून्यावर बाद, नंतर ठरला 'सर्वोत्तम कर्णधार'
प्रसाद ठाकरे हा 27 वर्षीय तरुण सर्वसामान्य कुटुंबात वाढलेला मुलगा आहे. त्याने मराठी माध्यमाच्या नगरपरिषदेच्या शाळेतून आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर खामगावमध्ये एलएलबी आणि एलएलएमचे शिक्षण पूर्ण केले. प्रसादने दिवाणी न्यायाधिश पदाची परीक्षा देण्याचे ठरवले. त्यानुसार नियोजन करुन इतरत्र वेळ खर्ची न लावता अथक परिश्रम घेत पहिल्याच प्रयत्नात या परीक्षेत यश संपदान केले. एकुण 250 गुणांच्या परीक्षेत प्रसादने लेखी पेपरमध्ये 109 आणि मुलाखतीमध्ये 32 गुण मिळवले. परीक्षेसाठी राज्यभरातून जवळपास 15 हजार विद्यार्थी बसले होते. मात्र, अंतिम यादीत फक्त 190 विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण झाले.
प्रसादचे वडील हिंदुस्थान लिव्हर कंपनीत कार्यरत असून, मुळगावी असलेली शेतीसुद्धा ते करतात. वडिलांनी नेहमी प्रेरणा देत शिक्षणात साथ दिल्यानेच हे यश प्राप्त झाले असल्याचे प्रसाद म्हणाला. मुंबई येथील उथ्थान ज्युडीशियल अॅकेडमी येथे प्रशिक्षण झाल्यानंतर जिल्हास्तरावर न्यायाधीश म्हणून त्याची नियुक्ती केली जाईल. मात्र बुलडाणा जिल्ह्याचे नाव प्रसादने उंचावले असून वडील साहेबराव ठाकरे यांनी जेमतेम परिस्थिती असताना प्रसादला शिकविले आणि आज न्यायाधीश म्हणून निवड झाल्याने याचा त्यांना झाला आहे.
प्रसादला दहावीमध्ये 60 टक्के, 12 वीमध्ये 51 टक्के, एलएलबीला 57 टक्के आणि एल एल एम ला 70 टक्के असे गुण मिळाले होते. सुरुवातीला प्रसाद 12 वीमध्ये कमी गुण मिळाल्यामुळे खचला होता. प्रसादची सुरुवातीला डॉक्टर व्हायची इच्छा होती. मात्र, त्याने काही दिवस शेती करण्याचे ठरवून 3 वर्ष शेती केली. शेती करताना दीड लाख रुपयांच्या कर्जाचा डोंगर झाल्यानंतर त्याने एलएलबीला प्रवेश घेत वकिली करण्याचे ठरविले. न्यायाधीश व्हायचं ध्येय ठरवून स्पर्धा परीक्षा देण्याचे ठरवले व खासगी क्लासला प्रवेश घेतला. त्यानंतर त्याने पहिल्याच प्रयत्नात न्यायिक दंडाधिकारी पदाला गवसणा घातली.
हेही वाचा - लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र येऊ, ममता बॅनर्जींचे शरद पवारांना पत्र