बुलडाणा - राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपें यांना बीडमध्ये आपली मागणी घेऊन भेटण्याचा प्रयत्न करणाऱ्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला होता. या घटनेचा बुलडाण्यातील कोविड रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी शनिवारी निषेध नोंदविला. यावेळी कोविड रुग्णालयातील महिला परिचारिका व पुरुष कर्मचाऱ्यांनी काळी फिती लावून पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
बीडमध्ये कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांवर लाठीचार्ज-
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यादरम्यान कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसंदर्भात दोन्ही मंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला असता त्यांना पोलिसांकडून मज्जाव करण्यात आला. त्यामुळे आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी या सर्व महिला व पुरुष कर्मचाऱ्यांनी अजित पवार यांच्या गाड्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करून त्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांकडून या सर्व कर्मचाऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. त्यामुळे या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी बुलडाणा येथील कोविड रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम करत घटनेचा निषेध व्यक्त केला.
राज्यामध्ये कोरोणाची भयावह परिस्थिती असताना या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपला प्राण पणाला लावत लाखो रुग्णांचे प्राण वाचवले, त्यावेळी सर्वांनी या कर्मचाऱ्यांचे देव समजून पूजा केली. त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. मात्र आता कोरोना संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याने या कर्मचाऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात येत आहे, अशा भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त करत या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.