बुलडाणा - चिखली शहरातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर आपल्या सख्ख्या मेहुण्याने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. घटनेला २१ दिवस उलटूनही अद्याप आरोपी मेहुण्याला अटक करण्यात आली नसून तो फरार आहे. चिखली पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांनी आरोपीला तात्काळ अटक करणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
असा घडला प्रकार -
चिखली शहरातील एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी २० ऑगस्ट २०२१ (शुक्रवार) रोजी आपल्या आई व वडिलांसोबत घरीच होती. यावेळी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास तिचा जालन्यावरून मेहुणा अचानक घरी आला. जावई घरी आल्यामुळे कुटूंबाने त्याचा चांगला पाहुणचार केला. २५ ऑगस्ट रोजी पीडित मुलीचा वाढदिवस असल्याने ते कारण पुढे करत मेहुण्याने तिला वाढदिवसानिमित्त कपडे खरेदी करून देतो म्हणत घरच्यांकडे तिला सोबत पाठवण्याची विनंती केली. जावई असल्याकारणाने घरच्या लोकांनीही या आग्रहाला नकार न देता जावयाला परवानगी दिली. आरोपीने आपल्या मोटारसायकलवर बसवून मुलीला शहरातील एका रेडिमेड कपड्याच्या दुकानात नेऊन कपडे खरेदी करून दिले.
कपडे खरेदी करून झाल्यावर घरी जाण्यासाठी मोटारसायकलच्या मागे बसलेल्या मुलीला कळले की, आपण घरच्या मार्गावर नसून दुसऱ्याच मार्गाकडे निघत आहोत. याबाबत मेहुण्याला विचारल्यावर त्याने सांगितले की, आपण एकदा दर्ग्यावर जाऊन येऊ. तिने याला नकार दिला तर मेहुण्याने आग्रह केला की, आपण दर्ग्यावर जाऊन लगेच येऊ आणि मोटारसायकल सरळ जुन्या मेहकर रोडवर जाऊन थांबवली. यावेळी अगोदर पासूनच एक पांढरी कार हजर होती. मोटारसायकल तिथेच उभी करून मेहुण्याने मुलीला गाडीत धक्का मारून बसवण्याचा प्रयत्न केला. तिने नकार दिल्यावर तिचा गळा दाबून तिला मारायची धमकी देत गाडीत कोंबले. ही गाडी मेहकर फाट्याच्या दिशेने जात होती आणि नंतर ती कोणत्या दिशेने गाडी जात होती हे मुलीला कळले नाही. यावेळी अल्पवयीन सालीवर मेहुण्याने गाडीतच दोन वेळा अतिप्रसंग केला.
हे ही वाचा - सचिन वाझे यांना मुंबईतील वोकहार्ट रुग्णालयात हलवले.. गरज पडल्यास ओपन हार्ट सर्जरी
मेहुण्याने पीडितेला धमकी दिली की, तुझ्या बहिणीला आणि घरच्यांना जर का काही सांगितले, तर तुला आणि तुझ्या बहिणीला मारून टाकेन. तुझे व्हिडिओ माझ्याकडे असून ते व्हायरल करून तुला बदनाम करून टाकेन व २१ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री ३ वाजता सदर मुलीला मेहुण्याने आपल्या घराबाहेर सोडून पळ काढला. तिची तब्येत पूर्णपणे बिघडली होती. ती बहिणीच्या घरी गेली असता तिथे तिचे आई बाबांसह सर्व नातेवाईक अगोदरपासूनच तिच्या शोधात तिथे एकत्रित होते. या सर्वांसोबत ती घरी आली. आपल्या बहिणीचा नवरा असल्याने फार विचार आणि हिम्मत करून तिने आपल्यावर झालेल्या अत्याचाराबाबत बहिणीला आणि घरच्या लोकांना सारी हकीकत सांगितली. यामुळे २३ ऑगस्टच्या सकाळी पीडित मुलगी, मोठी बहीण आणि आई वडिलांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
हे ही वाचा - वरिष्ठ काँग्रेस नेते व माजी केंद्रीय मंत्री ऑस्कर फर्नांडिस यांचे निधन
यावरून आरोपी मेहुण्याविरुद्ध कलम ३६३, ३६६-ए ३७६, १०९, १०२, पोस्को अधिनियम २०१२ चे कलम ४, ८, १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या आरोपी मेहुणा फरार आहे.