बुलडाणा - राम मंदिर बांधकामाबाबत शरद पवार यांनी केलेल्या विधानावर बुलडाणा जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम आणि जय श्रीराम लिहिलेली 500 पत्र शरद पवार यांना गुरुवारी (दि. 23 जुलै) पाठवली आहेत. आम्हाला वाटते कोरोना संपला पाहिजे आणि काही लोकांना वाटते मंदिर बांधून कोरोना जाईल, असे विधान शरद पवार यांनी केले होते. त्यानंतर देशभरात राजकारण तापले होते. भाजप कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्याने हे पोस्टकार्ड पाठवत असल्याचे भाजप युवा मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले.
भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार व प्रदेश उपाध्यक्ष आमदार संजय कुटे, भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार आकाश फुंडकर, आमदार श्वेता महाले पाटील, भाजयुमो जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांनी केलेल्या सूचनेनुसार भारतीय जनता युवा मोर्चा बुलडाणा शहराच्या वतीने भाजयुमो शहर अध्यक्ष विनायक भाग्यवंत यांच्या नेतृत्वाखाली पत्र पाठविण्यात आले आहे.
सुमारे 500 पत्र खासदार शरद पवार यांच्या पत्त्यावर पाठविण्यात आले आहेत. या पत्रावर भारत माता की जय, वंदे मातरम आणि जय श्रीराम लिहिण्यात आले आहे. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता पाटील, भाजयुमो जिल्हा सरचिटणीस पद्मनाभ बाहेकर,शहराध्यक्ष विजया राठी, महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस अल्का पाठक यांसह पदाधिकारी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.