बुलडाणा - जिल्ह्यासाठी लागणाऱ्या ऑक्सिजनची आवश्यकतेप्रमाणे जिल्हा प्रशासनाकडून मागणीच होत नाही. त्यामुळे जिल्ह्यात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयात लागणाऱ्या ऑक्सिजनच्या मागणीप्रमाणे नोंदणी करून पुरवठा करावा, अशी मागणी चिखली मतदारसंघाच्या भाजपा आमदार श्वेता महाले यांनी जिल्हाधिकारी एस. राममूर्ती, आयुक्त अमरावती आणि बुलडाणा, अकोला व वाशिम जिल्ह्यासाठी कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपायोजनांसाठी नेमलेले समन्वयक भारतीय प्रशासन सेवेतील आश्विन मुदगल यांच्याकडे केली आहे.
बुलडाणा जिल्ह्यामध्ये ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण गेलेले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यातील संसर्ग अतिशय वेगाने होत आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढून ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. परंतु जिल्हा प्रशासनाकडून मागणीप्रमाणे ऑक्सिजनची नोंदणी करून शासनाकडे मागणीच केलेली नाही. ही बाब 22 एप्रिल रोजी पत्र देऊन, तसेच दूरध्वनीद्वारे महाले यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. यामुळे जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले. यानंतर महाले यांच्या मागणीप्रमाणे वाढीव ऑक्सिजनची मागणी शासनाकडे नोंदविण्याचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले आहे.
जिल्ह्याची एवढी आहे ऑक्सिजनची मागणी-
बुलडाणा जिल्ह्याची ऑक्सिजनची मागणी 8 टनापेक्षा जास्त आहे. परंतु जिल्ह्यात केवळ 5 किंवा त्यापेक्षा कमी पुरवठा होत आहे. जिल्हा प्रशासनाने शासकीय रुग्णालयात लागणाऱ्या ऑक्सिजनची मागणी नोंदवलेली आहे. परंतु या मागणीत खासगी रुग्णालये समाविष्ट नाहीत. त्यामुळे खासगी रुग्णालयात लागणाऱ्या ऑक्सिजनची कमतरता मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे.