बुलडाणा - जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथील सामाजिक कार्यकर्ते अभयसिंह मारोडे यांचा 5 डिसेंबराला वाढदिवस होता. याच निमित्ताने संग्रामपूर ते शेगाव रस्त्यावरील खड्डे बुजवून त्याच खड्ड्यात त्यांचा वाढदिवस साजरा केला गेला. यानंतर त्यांनी खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन रक्तदान करत शेगाव येथील सईबाई मोटे रुग्णालयात फळे वाटप केले.
मागील काही महिन्यांपासून संग्रामपूर ते शेगाव खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून या रस्त्यावर दोन फुटावर खड्ड पडले आहेत. आजपर्यंत या रस्त्याने शेकडो बळी घेतले आहेत. दररोज या रस्त्यावर अपघात घडतात, तरीही राष्ट्रीय महामार्ग विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व मतदारसंघातील लोकप्रतिनिधी, राज्यकर्ते कुंभकर्णी यासाठी काहीच करत नाहीत. त्यामुळे, वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते अभयसिंह मारोडे यांनी शासनाचा निषेध करत वाढदिवस साजरा केला.
यावेळी डॉ संजय महाजन, गोपाल इंगळे, शंकर बोन्द्रे, शेख अनिस, गोंडूभाऊ, नारायण सावतकार यांनी श्रमदान केले. यानंतर खामगाव येथील रुग्णालयात जाऊन अभयसिंह मारोडे यांनी रक्तदान केले. 34 वर्षाच्या वयात त्यांनी 61 वेळा रक्तदान केले.