बुलडाणा - बॅंकांचे खासगीकरण करण्याच्या निर्णयाविरोधात आज बुलडाण्यात बॅंक कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान खासगीकरणाला विरोध करत, बॅंक कर्मचाऱ्यांनी 15 आणि 16 मार्च असा दोन दिवसांचा संप पुकारला आहे. आज संपाचा पहिला दिवस होता.
अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी 2021-22 च्या अर्थसंकल्पामध्ये काही बॅंकांचे खासगीकरण करण्याची घोषणा केली होती. यापूर्वी दिवाळखोरीत निघालेल्या बँकांना इतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये विलीन करण्यात आले आहे. मात्र आता येणाऱ्या काळात दोन राष्ट्रीयकृत बॅंकांचे खासगीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. दरम्यान या दोन बॅंका कोणत्या? त्यांची नावे जाहीर झाली नसल्याने बॅंक कर्मचारी धास्तावले आहेत. सरकारच्या या निर्णयाचा विरोध करण्यासाठी बॅंक कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांचा संप पुकारला आहे.
बॅंकेच्या खासगीकरणामुळे धोके वाढतील
बॅंकाच्या खासगीकरणामुळे खेड्यातील बॅंकिंग सेवा संपुष्टात येतील, शेतकऱ्यांना कर्ज मिळणार नाही. बेरोजगारांना देखील कर्ज मिळणे अवघड होईल. जनतेच्या ठेविची जोखमी वाढेल, अशा विविध कारणांसाठी आम्ही आंदोलन करत असल्याची प्रतिक्रिया यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्या बॅंक कर्मचाऱ्यांनी दिली.