बुलडाणा - बंजारा समाजात होळी म्हणजे आनंदाची पर्वणीच असते. सध्या होळीच्या निमित्ताने ठिकठिकाणच्या बंजारा तांड्यांवर याची चाहूल देणारं वातावरण तुम्हाला पाहायला मिळेल. सध्या होळीतील बंजारा लोकगीतांनी तेथील लोकांवर चांगलच गारुड घातले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव साकर्शा गावातील राज्यस्तरीय बंजारा होळी महोत्सवावर एक 'स्पेशल रिपोर्ट'.
जिल्ह्यातील देऊळगाव साकर्शा गावातील पारंपारिक डोंगरदऱ्यात राहणाऱ्या बंजारा समाजाने आपली वेगळी परंपरा, लोकसंस्कृती आणि वेगळेपण अजूनही जपलं आहे. हे वेगळेपण चालीरीती, पेहराव आणि बोलीभाषा या सर्वांमध्येच आले आहे. होळी हा उत्सव म्हणजे बंजारा समाजाची दिवाळीच असते. बंजारा समाजाच्या लोकसंस्कृतीचे सर्व पैलू उलगडणारा उत्सव म्हणजेच होळी. मुळात बंजारा समाज महिनाभर होळी साजरी करतो. होळीच्या आधी येणाऱ्या दांडी पौर्णिमेपासून त्यांच्या होळीला सुरुवात होते. याची चाहूल आणि लगबग या दिवसापासून बंजारा तांड्यांमध्ये 'लेंगी' गीतांनी होते.
परंपरांमध्ये महिलांना महत्वाचे स्थान
बंजारा समाजाचा होळी उत्सव जवळपास गुडीपाडव्यापर्यंत चालतो. या काळातील बंजारा लोकगीतं त्यांच्या संस्कृतीला समृद्ध आणि संपन्न करणारी असतात. होळीच्या काळात गाण्यात येणारी येणारी लोकगीतं आणि परंपरांमध्ये महिलांचं स्थान ठसठशितपणे समोर येते. फक्त मौखिक असणाऱ्या या गितांमध्ये बंजारा समाजाचा संघर्ष सांगणारी, शिक्षण, व्यसनमुक्ती तसेच एखाद्यावर वात्रट टीका करणारी गीतं म्हटली जातात. होळीत 'पाल', 'गेर', 'फगवा', 'धुंड' अशा अनेक परंपरा जोपासल्या जातात. समाजातील महिलाही मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी होतात. तर नोकरी निमित्तानं बाहेर गेलेला चाकरमानीही या होळीनिमित्तानं आवर्जून गावात आलेला असतो.
आपल्या देशात अनेक समाज आणि संस्कृतींनी आपलं वेगळं अस्तित्व टिकवून ठेवल आहे. मात्र, बंजारा समाजाने आपल्या संस्कृतीची गुंफण रंगोत्सव समजल्या जाणाऱ्या होळीभोवती गुंफत आपलं सांस्कृतिक वेगळेपण जपले आहे.