बुलडाणा - जिल्ह्यातील खामगाव येथे वृत्तसंकलन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारावर हल्ला करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. तसेच त्यांचा मोबाईल फोन फोडण्यात आला. त्यामुळे पत्रकारांनी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
खामगाव येथे अवैधरीत्या अग्रवाल फटाका केंद्र चालवत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी हे फटाका केंद्र सील करण्याची कारवाई केली. या प्रसंगाचे वृत्तसंकलन करण्यासाठी गेलेले पत्रकार शिवाजी भोसले यांना सुनील अग्रवाल, संगीत अग्रवाल, गब्बू गोजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जीवे मारण्याची धमकी देत भोसले यांचा मोबाईल फोडला. याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. याप्रकरणी गब्बू गोजरीवाल याला अटक करण्यात आली असून दोन आरोपी फरार झाले आहेत.
दरम्यान मराठी पत्रकार संघ आणि टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकारी सुमन चंद्रा व जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ यांची भेट घेतली. यावेळी आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. तसेच यासंबंधित निवेदन देण्यात आले. मात्र, यावेळी पोलीस अधीक्षकांची भेट होऊ शकली नाही. तरीही त्यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून आरोपींवर गुन्हा दाखल करणार असल्याचे आश्वासन दिले.