बुलडाणा - मराठा आरक्षण संदर्भात काँग्रेसचे नेते अशोकराव चव्हाण यांनी सोमवारी 11 जानेवारीला दिल्लीमध्ये जेष्ठ वकिलांची बैठक घेतल्याचे सांगितले. परंतु या बैठकीला याचिकाकर्त्यांचे वकील होते. त्यामुळे सरकारी वकीलांना या बैठकीला का बोलावले नाही, असा प्रश्न शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी विचारला आहे. तसेच अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणासंदर्भात बैठकीचा फक्त फार्स केला. मात्र, प्रत्यक्षात ते प्रदेशाध्याक्षच्या पदासाठी मोर्चे बांधणीसाठी दिल्लीत गेले होते, असेही ते म्हणाले.
मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप -
मराठा आरक्षण संदर्भात आम्ही काही तरी करतो आहे, हे त्यांना दाखवायचे होते. या बैठकीत जेष्ठ वकील अभिषेक मनोज संगवे यांच्या व्यतिरिक्त दुसरे कुठलेच जेष्ठ वकील यावेळी उपस्थित नव्हते. मग यावेळी बैठकीला इतर याचिकाकर्त्यांचे वकील का बोलावले नाही, त्यामुळे अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षण संदर्भात ही बैठक असल्याचे सांगून कुणालाही विश्वासात न घेता मराठा समाजाची फसवणूक केली आहे, असा आरोप विनायक मेटे यांनी केला.
राजीव सातव प्रदेशाध्यक्ष होऊ नये म्हणून चव्हाण दिल्लीला -
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावर राजीव सातव यांची नियुक्ती होवू नये, याची मोर्चे बांधणी करण्यासाठी राहुल गांधींना भेटायचे होते. त्यामुळे अशोक चव्हाण दिल्लीला गेले होते. त्यासाठी दिल्लीत काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते, असा आरोपही मेटेंनी केला.