बुलडाणा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर लॉकडाऊन करण्यात आला आहे. प्रशासन सातत्याने लोकांना घरात राहण्याचे आवाहन करत आहे. अशातच काही लोक नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज (गुरुवारी 9 एप्रिल) होत असलेल्या मुस्लिम धर्मीयांनाची "शब-ए-बारात''ची रात्रीची प्रार्थना घरातूनच करावी, असे आवाहन बुलडाणा राष्ट्रवादी जिल्ह्याचे अध्यक्ष अॅड. नाजेर काजी यांनी मुस्लीम समुदायाला केले आहे.
कोणीही कबरस्थानच्या ठिकाणी जाऊ नये ,आपल्या स्वर्गवासी नातेवाईकांसाठीही घरातूनच प्रार्थना करावी. केंद्र आणि राज्य शासनाने केलेल्या निर्बधांची काटेकोरपणे अंबलजावणी करावी, असे आवाहन मुस्लीम समुदायाला काजी यांनी केले आहे. त्यांनी एक व्हिडिओ सोशल मीडिया वर प्रसारित करून हे आवाहन केले आहे.
मुस्लिम धर्मीयांची रात्रभर प्रार्थना करणारी "शब-ए-बारात"ची रात्र आज आहे. आजच्या रात्रभर सगळे मुस्लिम धर्मीय मिळून नमाज पठण करत असतात. यावेळी जीवनातील व देशातील सर्व परिस्थितीवर अल्लाहकडे प्रार्थना केली जाते. तर मध्यरात्री आपले स्वर्गवासी झालेल्यांसाठी ज्या ठिकाणी कबरस्थान आहे, तेथे त्यांच्यासाठी पार्थाना केली जाते. मात्र, यावर्षी भारतासह राज्यात कोरोनाच्या खबरदारीमुळे लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता गर्दी वाढू नये, म्हणून शासनाकडून संचारबंदी लावण्यात आली आहे.