बुलडाणा - बोलेरो आणि सिमेंट घेऊन जाणाऱ्या कंटेनरचा भीषण अपघात झाल्याने एकाच कुटुंबातील तिघेजण ठार झाले आहेत. तर बोलेरो चालकाचाही मृत्यू झाला आहे. हा अपघात नागपूर-औरंगाबाद महामार्गावर असलेल्या मेहकर तालुक्यातील अंजनी बुद्रुक फाट्यावर झाला. हा अपघात मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास झाला. मृत प्रवासी हे औरंगाबादचे रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे.
अपघात हा एवढा भीषण होता, की कंटेनरने बोलेरोला ५० फुटाहून अधिक अंतरावर पुढे ढकलत नेले. यामध्ये बोलेरोचा संपूर्ण चुराडा झाला. मृत प्रवाशांना जेसीबी मशीनच्या सहाय्याने बोलेरोमधून बाहेर काढावे लागले. अपघातातील मृताध्ये क्षीरसागर कुटुंबातील ३ जण ठार झाले आहेत. त्यामध्ये मनोहर क्षिरसागर (७०) त्यांची पत्नी नलिनी (६६), मुलगी मेघा (३५) यांचा समावेश आहे. बोलेरो चालक सुगदेव नागरे (२५) यांचाही मृतात समावेश आहे.
क्षीरसागर परिवार हे वाशिमला त्यांच्या मुलाच्या विवाहासाठी मुलगी पाहायला गेले होते. तेथून घरी परतत असताना त्यांच्या बोलेरोला अपघात झाला. पोलिसांनी घटनास्थळ जावून पंचनामा केला आहे.
कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे महिन्यांपूर्वी याच ठिकाणी अपघात होऊन ५ जणांचा मृत्यू झाला.