बुलडाणा : जिल्ह्यात आज बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याने सर्वत्र एकच खळबळ माजली आहे. गटशिक्षणाधिकारी सिंदखेडराजा यांनी दिलेल्या तक्रारीवरून सिंदखेडराजा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र विद्यापीठ कायद्याच्या विविध कलमानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेगाव परीक्षा केंद्रावर पेपर फुटला : राजेगाव येथून एका शाळेतून हा पेपर फुटला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली असून तक्रारीत नमूद प्रमाणे राजेगाव हा भाग साखरखेर्डा पोलीस स्टेशनच्या हद्दीत आहे. त्यामुळे सदर गुन्हा साखरखेर्डा पोलिसांकडे वर्ग करणार असल्याची माहिती सिंदखेड राजा पोलीस निरीक्षक केशव वाघ यांनी दिली आहे. बारावीचा पेपर राजेगाव येथील एका परीक्षा केंद्रावरून फुटला असल्याची माहिती तक्रारीत नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे आता पोलीस कारवाईत काय तथ्य समोर येतात ते पाहावे लागणार आहे.
पेपर सोशल मीडियावर व्हायरल : आज संपूर्ण राज्याच किंबहुना विधानसभेपर्यंत पोहोचलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा राजेगाव येथे सकाळी साडेदहा वाजता बारावीच्या परीक्षेचा पेपर सोशल मीडिया वर व्हायरल झाला. संपूर्ण राज्याचे शिक्षण विभाग खळबळून जागी झाले. या प्रकरणी संपूर्ण यंत्रणा कामाला लागल्यानंतर सध्या सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये देखील विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी या प्रश्नाला उचलून धरले. त्यानंतर हरकतीमध्ये आलेले सरकार खडबडून जागा झाले.
खरे सूत्रधार कोण : याप्रकरणी साखरखेर्डा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रंगलाल कल्याणराव गावडे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती सिंदखेड राजा यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकंदरीत आज संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेणारे या प्रकरणांमध्ये अखेर गुन्हा तर दाखल झाला आहे .पण याचे खरे सूत्रधार पर्यंत पोहोचणे देखील आता पोलीस प्रशासनाला साधावे लागणार आहे. कारण की सध्या गुन्हा हा अज्ञाताच्या विरुद्ध असला तरी, याचे पायमुळे कुठवर रोल्या गेले आहे हे येणारा काळात समजेल.