बुलडाणा - शहरापासून जवळच असलेल्या धाड येथे एका भंगारच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत 7 दुकाने भस्मासात झाली आहेत. ही घटना आज (गुरुवार) दुपारी घडली. आगीत 50 लाख 46 हजारांचे नुकसान झाले आहे. गावातील सर्व नागरिक, पोलीस आणि महसूल प्रशासन यासह बुलडाणा, चिखली, जाफ्राबाद येथील अग्निशामक दलाच्या मदतीने 2 तासानंतर आग आटोक्यात आली. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचे बोलले जात आहे.
बस स्टॅंड परिसराला लागून असलेल्या भंगारच्या दुकानाला अचानक आग लागली. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले. या आगीमुळे शेजारच्या बांबू, चहा-नाष्टा, हार्डवेअर दुकान, दुचाकीचे गॅरेज, कलर आणि कॉम्प्युटरचे दुकान अशा 7 दुकानाला आगीने घेरले होते. या घटनेची माहिती गावात मिळताच पोलीस, ग्रां. प. प्रशासन, महसूल, आणि गावातील खासगी टँकरधारक, असंख्य तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली. आपापल्या परीने आसपासच्या दुकानातील साहित्य व फर्निचर बाहेर काढून आग विझवण्यासाठी परिश्रम घेतले.
यावेळी खासगी टँकरसह बुलडाणा, चिखली, जाफ्राबादच्या अग्निशामक दलाने आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत 7 दुकानातील 50 लाख 46 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा महसूल विभागाच्यावतीने मंडल अधिकारी ए. एन. शेळके, तलाठी प्रभाकर गवळी, कोतवाल बापू तोटे यांनी केला आहे.