बुलडाणा : जिल्ह्यात एक अजब प्रकार समोर आला आहे. दिल्लीतील निरज बवान गॅंगस्टरच्या नावाने पंकज खर्चे यांना तब्बल ४० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. केशवनगरमध्ये राहणाऱ्या पंकज खर्चे यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या कारची मागील काच फोडून एका चिठ्ठीच्या माध्यमातून ही चाळीस लाखाची खंडणी मागण्यात आली आहे. एवढेच नाही तर पंकज खर्चे यांच्या मावशीच्या घरी देखील चिठ्ठी पाठवत पंकज खर्चे यांना पैसे द्यायला सांगा असे सांगण्यात आले. त्यामुळे खरंच खंडणी मागणारे हे दिल्लीतील बवान गँगचे गँगस्टर आहेत की, कोणी आपसातील वैरी आहेत ? याचा तपास बुलडाणा पोलीस करत आहेत.
अशी दिली धमकी : नेहमी मोठ्या मेट्रो शहरामध्ये खंडणी मागितल्याच्या घटना आपण नेहमी वाचत असतो. पण आता अशा घटना बुलढाणासारख्या शहरापर्यंत येऊन पोहचल्या आहेत, असे म्हटले तर आश्चर्य वाटायला नको. '४० लाख रूपये दे और छुट जा, पैसे नहीं दिया तो तेरे घर में बिवी और तेरी २ बेटी रहती है, सबका गेम कर दूंगा!' अशी धमकी देण्यात आली आहे. दिल्लीचा गँगस्टरचा निरज बवानाच्या नावाने बुलडाण्यात खंडणी मागितल्याची घटना घडल्यानंतर पोलिस सतर्क झाले.
कारच्या मागील काच फोडली : शहरातील केशव नगर भागात पंकज अरुण खर्चे वय ४२ वर्षे हे वास्तव्यास आहेत. ते म्युचल फंड डिस्ट्रिब्युटर आहेत. यांच्या मोबाईलवर ८ जुलैच्या सायंकाळी ५.३५ दरम्यान एका अज्ञात व्यक्तीचा कॉल आला. मला तुझी सगळी कुंडली माहीत आहे. मला ४० लाख रुपये दे, तू जर पैसे दिले नाही, तर मी तुझा गेम करून टाकीन, अशी धमकी दिली. त्यानंतर खर्चे घरी गेले व जेवण करून झोपून गेले. दरम्यान ९ जुलैच्या सकाळी ६.१५ वाजता झोपेतून उठून अंगणात गेले, त्यावेळी त्यांच्या कारच्या मागील काच फुटलेली दिसली.
खंडणीचा गुन्हा दाखल : तसेच कारजवळ दोन दगडाखाली ठेवेलेली एक धमकीची चिठ्ठी दिसली. त्यांनी चिठ्ठी वाचून पाहिली असता, तिच्यावर 'मैने तुझे फोन किया था, मैं निरज बवाना का राइट हैंड ह, मै तुम्हे ३ दिन का टाइम देता हु, ४० लाख रूपये दे और छुट जा, पैसे नहीं दिया तो तेरे घर में बिवी और तेरी २ बेटी रहती है, सबका गेम कर दुंगा,' अशा आशयाच्या हिंदी भाषेत धमक्या लिहलेल्या दिसल्या. या प्रकरणी पंकज खर्चे यांनी बुलढाणा शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द कलम ३८५, ५०६, ५०७ भादंवि प्रमाणे खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास ठाणेदार काटकर मार्गदर्शनात शहर पोलीस करीत आहेत.
पोलिसांचा शोध सुरू : ठाणेदार काटकर यांनी सदर बाब गांभीयाने घेऊन तात्काळ खर्चे यांच्या घरी धाव घेतली. घटनास्थळी पंचनामा करुन उपरोक्त चिठ्ठी ताब्यात घेण्यात आली. तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून आरोपीचा काही सुगावा लागतो का ? याचा शोध सुरु केला आहे.
हेही वाचा -