बुलडाणा - प्रयोगशाळेत तपासणीसाठी काही कोरोना संशयितांचे नमुने पाठवण्यात आले होते. यातील 4 जणांचे अहवाल आज प्राप्त झाले असून, त्यापैकी 1 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 3 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
प्राप्त पॉझिटिव्ह अहवाल हे जळगाव जामोद येथील 56 वर्षीय पुरुष, बहापुरा ता. मलकापूर येथील 24 वर्षीय महिला व डोणगाव, ता. मेहकर येथील 20 वर्षीय महिला रुग्णाचे आहेत. डोणगाव येथील महिला रिसोड जि. वाशिम येथून आली असून या महिलेचा स्वॅब रिसोड येथे पॉझिटिव्ह आला आहे.
आतापर्यंत 81 कोरोनाबाधित रुग्ण हे निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. सध्या रुग्णालयात 47 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेकडून मिळाली आहे.
तसेच आतापर्यंत 1 हजार 873 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 133 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यापैकी 5 मृत आहेत. आजरोजी 25 अहवाल प्रतिक्षेत आहेत, अशी माहिती निवासी उप जिल्हाधिकारी यांनी दिली.