बुलडाणा - लोणार तालुक्यातील दोघे जण ३ दिवसांपूर्वी आलेल्या नदीच्या पुरात वाहून गेले होते. तेव्हापासून त्यांचा शोध सुरू होता. मात्र, आज या दोघांचाही मृतदेह चोरपांग्रा तलावात सापडला आहे. रवी गायकवाड आणि नारायण गायकवाड अशी मृतांची नावे आहेत.
लोणार तालुक्यातील बीबी गाव परिसरात १ नोव्हेंबरच्या रात्री मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे तालुका परिसरातील नदीला पूर आला होता. दरम्यान, सिंधखेडराजा तालुक्यातील देऊळगाव कोळे येथील एस.टी महामंडळ वाहक रवी गायकवाड आणि आडत चालक नारायण गायकवाड हे मोटारसायकलवरून जात असताना ते बीबी गावालगत असलेल्या पुलावरून गेले. मात्र, पुलावरून जाताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही मोटरसायकलसह वाहून गेले होते.
त्यानंतर, चोरपांग्रा येथील तलावात स्थानिक नागरिकांच्या मदतीने ३ दिवसांपासून या दोघांचा शोध सुरू होता. मात्र, शोधकार्यात अपयश आल्यामुळे राज्य आपत्ती निवारण पथकाला पाचारण करण्यात आले. आज सकाळी ६ वाजल्यापासून राज्य आपत्ती निवारण दलाच्या जवानांनी शोध मोहीम सुरू केली असता, त्यांना रवी गायकवाड आणि नारायण गायकवाड या दोघांचेही मृतदेह सापडले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
हेही वाचा- बुलडाण्यात पावसाचा कहर; ज्ञानगंगा नदीला महापूर, २ गावांचा संपर्क तुटला