बुलढाणा: खाजगी शाळेवरील या दोन्ही शिक्षकांची कसून चौकशी सुरू केली. पेपरफूटी प्रकरणात त्यांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना नेण्यात आले होते. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना रितसर अटक करण्यात आले आहे. ताब्यात घेतलेल्या या संशयितांची नावे, शेख शकील शेख मुनाफ व अंकुश पृथ्वीराज चव्हाण राहणार सावरगाव तेली, तालुका लोणार येथील आहेत. या दोघांना रात्री अटक करण्यात आले आहे. पेपरफूटी प्रकरणातील आरोपींची आजपर्यंतची संख्या ७ झाली आहे. तर आरोपींच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. असे पोलिसांनी सांगितले आहे.
व्हाट्सअप ग्रुपवर पेपर: यासाठी काही जणांचा व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात आला होता. या ग्रुपवर शिक्षक पेपर टाकत होते. विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी दहा ते बारा हजार रुपये घेण्यात आले आहे असा संशय आहे. पुढील तपास याच प्रकरणात साखरखेर्डा पोलीस ठाण्याचे ठाणेदार काळे हे करत आहेत. १२ वी चा गणित विषयाचा पेपर परीक्षेपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची घटना 3 मार्च रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात घडली होती. या संपूर्ण पेपर फुटीचे पडसाद सुरू असलेल्या राज्याच्या अधिवेशनात देखील उमटले होते.
फूट प्रकरणाचे फोटो : विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी अधिवेशनादरम्यानच या पेपर फूट प्रकरणाचे फोटो अधिवेशनात दाखवले. त्यानंतर राज्य सरकारला धारेवर धरत या प्रकरणात दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर राज्य सरकार खळबळून जागे झाले होते. गटशिक्षणाधिकारी सिंदखेडराजा यांनी दिलेल्या तक्रारीवरून सिंदखेडराजा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. साखरखेर्डा पोलीसांनी पाच आरोपींना अटक केली. त्यांच्यावर कलम 420, 120 ब तसेच विद्यापीठ कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खाजगी संस्थाचालक असलेले शिक्षक गजानन आडे, गोपाल शिंगणे, यांच्यासह गणेश पालवे, पवन नागरे, गणेश नागरे या पाच जणांना आरोपी ठरवत अटक करण्यात आली आहे. ह्या पाचही आरोपींना देऊळगावराजा न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना १० मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.