भंडारा- जिल्ह्यातील पहिल्या कोरोनाबाधित महिलेने कोरोनाला हरवले, मात्र क्षयरोगाने तिचा मृत्यू झाला. या महिलेचा मृत्यू बुधवारी नागपूर येथे तिच्या राहत्या घरी झाला आहे.
मूळची नागपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या 45 वर्षीय महिलेला क्षयरोग झाला होता. त्यावर उपचारासाठी ती भंडारा तालुक्यातील गराडा येथे आपल्या भावाकडे आली होती. तिथे ती खासगी रुग्णालयात उपचार घेत होती. या महिलेची प्रकृती बिघडल्याने तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
महिलेला श्वसनाचा त्रास होत असल्याने कोरोना वॉर्डात दाखल करून तिच्या घशातील स्रावाच नमुना 23 एप्रिलला प्रयोगशाळेत पाठविला होता. त्याचा अहवाल 27 एप्रिलला प्राप्त झाल्यावर ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आले. ही महिला जिल्ह्यातील पहिली कोरोनाबाधित रुग्ण असल्याने जिल्हा प्रशासनाद्वारे खबरदारीचा उपाय म्हणून गराडा-मेंढा या गावांना कंटेंनमेंट झोन म्हणून जाहीर केले होते.
महिलेवर कोविड रुग्णालयात उपचार केल्यानंतर 14 दिवसांनी तिचे दोन नमुने निगेटिव्ह आल्याने ती कोरोनामुक्त झाल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले. मात्र तिच्यावर क्षयररोगाचे उपचार सुरू होते.
तथापि, मंगळवारी श्वसनाचा त्रास होत असल्याने तिला नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले होते. तिच्यावर उपचार सुरू असताना तिच्या कुटुंबीयांनी आपल्या जबाबदारीवर गौतमनगर येथील राहत्या घरी नेले. परंतु बुधवारी रात्री प्रकृती बिघडून तिचा मृत्यू झाला.
वास्तव गुलदस्त्यात
महिला कोरोनामुक्त झाली तसेच क्षयरोगातूनही बरी झाली, असे सांगण्यात आले होते. मात्र,त्यानंतर ही महिला कुठे गेली तिच्यावर उपचार सुरू आहे की नाही, या विषयी गोपनीयता ठेवली गेली. त्यातच या महिलेचा बुधवारी नागपूर येथे मृत्यू होऊनही प्रशासनाला याविषयी माहिती मिळाली नाही, की प्रशासनाने ती माहिती लपवून ठेवली, हे अजूनही गुलदस्त्यात आहे.
याविषयी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके यांना विचारले असता त्यांनी सांगितले की महिला कोरोनामुक्त झाली होती. परंतु, तिचा क्षयरोग कायम होता. तिला श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने नागपूरला हलविण्यात आले. तेथे तिचा मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली. मृत्यूचे कारण शोधण्यासाठी समिती चौकशी करीत आहे. लवकरच अहवाल प्राप्त होईल, असेही उईके यांनी सांगितले.