भंडारा- उन्हाळ्यात पक्षांसाठी अन्न पाणी मिळविणे अतिशय कठीण जाते. जिथे तापमानामुळे माणसाचेच जीवाची लाही लाही होत आहे, त्यातच पशुपक्ष्यांचा किती हाल होत असतील, याचाच विचार करून विकास बावनकुळे या युवकाने स्वतःच्या घरी पक्ष्यांना साठी बर्ड फिडर बनवून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला.
लॉकडाऊनमध्ये प्रत्येकजण घरी आहे. या फावल्या वेळचा योग्य उपयोग करत विकासने एक नवीन पद्धतीचा बर्ड फिडर बनवले आहे. विकास हा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स नागपूर येथे भौतिकशास्त्र विषयात एमएससी व्दितीय वर्षाचा विद्यार्थी असून भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील पळसगाव/कोलारी या गावचा आहे. या फिडर साठी त्यांनी घरी असलेल्या टिनाचा डब्बा घेत त्याला चारही बाजूने हवा असलेल्या पद्धतीने कापले. या फिडर च्या चारही बाजूने दाणे ठेवले जाते तर मध्येभागी पाणी ठेवले जाते. आणि पाणी थंड ठेवण्यासाठी त्याला चारही बाजूने पोते गुंडाळून एक नवीन प्रकारचां बर्ड फिडर तयार करून टाकावू पासून टिकाऊ कसे तयार करता येईल याकडे विशेष लक्ष दिले आहे.
पक्ष्यांना खाद्य पाणी मिळत असल्यामुळे पक्षी रोज येतात. यावर्षी 20 पेक्षा जास्त पक्ष्याच्या प्रजातींची नोंद विकासने केली आहे. यात ब्राह्मणी मैना, साळुंखी, हुप्प्या, कोतवाल, कोकिळा, बुरखा हळद्या, कावळा, चिमणी, सातभाई आणि कवडा गप्पीदास यासारखे वेगवेगळे पक्षी खाद्य व पाणी पिण्यासाठी रोज येतात.
विकासला पक्षी मोजणे, वन्यजीव प्रगणना, जंगल संवर्धन, झाडे लावणे, जंगल भ्रमण हे त्याचा छंद आहेत. बीएससी पदवीचे शिक्षण घेत असताना त्याला निसर्गाच्या सानिध्यात राहून पशुपक्ष्यांसाठी काम करण्याची आवड निर्माण झाली. तो डब्ल्यूडब्ल्यूएफ , बीएनएचएस अशा वेगवेगळ्या संस्था व वेगवेगळ्या नेचर क्लबचा सदस्य असून मागील सहा वर्षापासून काम करत आहे.