भंडारा - शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन फोडून चोरट्यांनी 9 लाख 41 हजार रुपयांची रोख लांबवल्याने खळबळ उडाली. ही घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली आहे. गॅस कटरने हे एटीएम मशीन फोडून रोकड लांबवली. चोरीच्या पद्धतीवरून हे सराईत गुन्हेगारांचे काम असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. विशेष म्हणजे या एटीएमवर बँकेचा सुरक्षा रक्षकही नव्हता.
लॉकडाऊनच्या कार्यकाळात चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली होती. मात्र लॉकडाऊन शितल होताच चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. भंडाऱ्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील पटवारी भवनच्या अगदी पुढे असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये चोरी झाली. एटीएमला गॅस कटरने कापून यामधील तब्बल 9 लाख 41 हजार रुपये चोरट्यांनी नेले आहेत. एटीएमच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ओळख पटू नये, म्हणून चोरट्याने विशेष खबरदारी घेतली आहे.
हे एटीएम राष्ट्रीय महामार्गावर असून सुद्धा पहिल्या माळ्यावर असल्याने इतर एटीएम प्रमाणे या एटीएममध्ये वर्दळ नसते. त्यामुळेच या एटीएम चोरीची घटना दुपारी उघडकीस आली आहे.
ही चोरी रात्रीच्या सुमारास झाली असावी, असा अंदाज पोलिसांचा आहे. सकाळी एक वाजेच्या दरम्यान एटीएममध्ये पैसे काढण्यास ग्राहक गेल्यानंतर ही चोरीची घटना पुढे आली. घटनेची माहिती मिळताच भंडारा पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचून चौकशी सुरू केली आहे. भंडारा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पुढील शोध घेत आहेत.
सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव थांबविण्यासाठी पन्नास वर्षाच्या वर वय असलेल्या पोलिसांना ऑफिशियल कामे दिले जातात. कंटेनमेंट क्षेत्रात, विलगीकरण कक्ष, अलगीकरण कक्ष आणि जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांची तैनाती असल्यामुळे पोलिसांवर कामाचा ताण वाढलेला आहे. पोलिसांची संख्या कमी असल्याने अपेक्षित प्रमाणात तपासणी होत नाही. त्याचा फायदा हे चोरटे घेत असल्याचे दिसून येत आहे.