भंडारा - साकोली तालुक्यात तलावात बुडणाऱ्या पत्नीला वाचविण्यासाठी गेलेल्या पती आणि भाच्याचा दुर्दैवी अंत झाला आहे. मात्र, पत्नीला मात्र सुखरूप वाचविण्यात यश आले आहे. ही घटना मंगळवारी सकाळी 8 ते 9 वाजताच्या दरम्यान घडली. आसिफ दिलावर शेख (वय 45) असे एका मृताचे नाव असून ते भाजी विक्रेते होते. त्यांचा भाचा शोएब महमूद कनोजे (वय 15 रा. सिव्हिल वॉर्ड, साकोली) याचाही बुडून मृत्यू झाला. प्राथमिक माहिती नुसार, घरगुती भांडणामुळे आसिफ यांची पत्नी तलावात आत्महत्या करायला गेली होती. तिला वाचवण्याच्या प्रयत्नात इतर दोघांचा मृत्यू झाला.
मृत आसिफ शेख हे भाजीविक्रेते होते. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये त्यांचा व्यवसाय अडचणीत आला होता. त्यांची आर्थिक परिस्थिती खराब झाल्याने ते कर्जबाजारीही झाले होते. यामुळे आसिफ आणि त्यांच्या पत्नीमध्ये नेहमी वाद होत होते. सकाळी आसिफ व पत्नीमध्ये वाद झाला. यामध्ये रागाच्या भरात पत्नीने घराजवळील नवतलावाकडे धाव घेतली आणि पाण्यात उडी मारली. तिला वाचवण्यासाठी पती आसिफ यानेही तलावात उडी घेतली. या दोघांना वाचविण्यासाठी आसिफ यांचे जावई महमूद आणि भाचा शोएब यांनीही तलावात उडी घेतली. मात्र, हे सर्व पाण्यात बुडू लागले.
तलावाच्या बाहेर उभ्या असलेल्या आसिफ यांच्या मुलाने या चारही लोकांना वाचविण्यासाठी मोठ्यानेे 'वाचवा वाचवा, माझ्या आई-वडिलांना वाचवा' अशा आर्त हाका मारत आरडाओरड सुरू केली. त्याचा आवाज ऐकून तलावाशेजारील बेलदार समाजाच्या वस्तीतील युवकांनी तलावाकडेे धाव घेतली. काही युवकांनी तलावात उतरून कसेबसे आसिफ यांची पत्नी आणि जावई महमूद यांना बाहेर काढले. मात्र, ते आसिफ आणि त्यांचा भाचा शोएब यांना वाचवू शकले नाहीत. आसिफ आणि शोएबचा तलावात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पाण्यात बुडलेले मृतदेह बाहेर काढण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करून ते कुटुंबीयांना देण्यात आले.
दरम्यान, आसिफ यांच्या मुलाची हाक ऐकून बेलदार समाजाचे गणेश बोकडे, निलेश घरडे, अमर बोकडे, शब्बीर पठाण यांनी योग्य वेळी प्रयत्न केल्यामुळे दोघांचे प्राण वाचले. या प्रकरणी पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सावंत करीत आहेत.