भंडारा - तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी अज्ञात व्यक्तींचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या दोन्ही व्यक्तींचा मृत्यू नेमका कशाने झाले हे समजले नाही. त्यात सध्या कोरोना विषाणूने थैमान घातले असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मृतदेहाला उचलण्यासाठी सुरक्षा कीट नसल्याने सुरुवातीला कोणीही हात लावण्यास तयार नव्हते. शेवटी फक्त हॅण्डग्लोव्हज घालून पोलिसांनी आणि नगर पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी हे मृतदेह रुग्णवाहिकेत पोहोचवले. पहिल्या घटनेत भंडारा तालुक्यातील मुजबी गावाजवळ राष्ट्रीय महामार्गाच्या शेजारी एका 40 ते 45 वर्षाच्या अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला. हा व्यक्ती कोण, तो कुठून आला, याचा शोध पोलिसांनी घेतला. मात्र, अज्ञापही त्याची माहिती मिळाली नाही.
लॉकडाऊनमुळे इतर राज्यातील किंवा जिल्ह्यातील मजूर पायी चालून त्यांच्या घरी परत जात आहेत. हा त्यांच्यापैकी तर नाही ना अशी शंका व्यक्त केली जात आहे. सध्या याची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली. दुसरी घटना शहरातील कृष्णपुरा वार्डात एका फळ विक्रेतेच्या गोदामात घडली आहे. लॉकडाऊनच्या काळात हे गोडाऊन बंद आहे. बुधवारी फळ विक्रेता तिथे गेला असता बाथरूममध्ये एक 30 ते 35 वर्षाचा व्यक्ती झोपलेला दिसला. फळ विक्रत्याने त्याला आवाज देत उठविण्याचा बराच प्रयत्न केला. त्याच्या चेहऱ्यावर पाणी मारून बघितले, मात्र तो अजिबात हलचाल करीत नसल्याने फळ विक्रत्याने याची माहिती पोलिसांना दिली.
पोलिसांनी घटनास्थळ गाठत तपासणी केली असता त्याचा मृत्यू झाल्याचे समजले. त्या व्यक्तीच्या नाका-तोंडात कपडा होता. त्यामुळे त्याची हत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. हे मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविले आहेत. रुग्णालयाने दोन्ही मृतदेह शितपेटीत ठेवून त्यांच्या घशाचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. या दोघांच्या मृत्यूचे नेमके कारण हत्या की कोरोना या प्रश्नाचे उत्तर अहवाल आल्यानंतर समजेल.