भंडारा - दिल्लीतील निजामुद्दीन येथील एका धार्मिक कार्यक्रमाहून जिल्ह्यामध्ये आलेल्या 2 व्यक्तींना सुरूवातीला होम क्वारंटाईन करण्यात आले होते. आज मिळालेल्या माहितीनंतर त्या दोघांनाही इन्स्टिटयूटला क्वारंटाईन करण्यात आलेले असून, त्यांच्यामध्ये कोरोनाचे कोणतेही लक्षणे आढळून आलेली नाहीत. त्यांचे नमुने घेऊन चाचणी करीता पाठवीण्यात आले आहेत. तर हरिद्वारवरून परत येताना निजामुद्दीन स्टेशनवरून आलेल्या 20 लोकांपैकी 6 लोकांना इन्स्टिट्यूटला क्वारंटाईन केले आहे. तर याअगोदर इन्स्टिट्यूटमध्ये क्वारंटाईन केलेल्या 14 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
निजामुद्दीनच्या मरकजमधून परतलेल्या बऱ्याच लोकांना कोरोना झाला असल्याने संपूर्ण देशात खळबळ निर्माण झाली. भंडारामध्येही दिवसभर नागरिकांमध्ये आपल्या जिल्ह्यात कोण आले आहे, याची चर्चा होती. कधी 4 लोक तर कधी 9 लोक आले अशी चर्चा सुरू होती. शेवटी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार मरकजवरून दोन लोक आले आहेत. या दोन्ही लोकांना सध्या कोणतेही लक्षणे दिसत नाहीत तरी त्यांना सध्या इन्स्टिट्यूट मध्ये अलगीकरण केले गेले आहे.
लाखनी तालुक्यातील 20 लोक हरिद्वारला गेले होते. परत येताना हे सर्व निजामुद्दीन स्टेशनवरून 22 तारखेला निघाले. त्यामुळे यांच्या पैकी 6 लोकांना इन्स्टिट्यूट क्वारंटाईन केले गेले आहे. भंडारा जिल्हयातील विदेशातून परत आलेल्या लोकांना शीघ्र प्रतिसाद पथकाने भेट दिलेल्यांची संख्या 43 झाली आहे. त्यापैकी सहा व्यक्तींना आयसोलेशन वार्डमध्ये भरती करण्यात आले आहे. आता हॉस्पीटल क्वारंटाईन देखरेखीत 15 व्यक्ती भरती आहेत. आतापर्यंत 14 व्यक्तींना हॉस्पीटल क्वारंटाईन मधून डिचार्ज देण्यात आला आहे. तर घरात अलगीकरण केलेल्या व्यक्तींची संख्या 23 आहे.
आतापर्यंत पुणे, मुंबई व इतर राज्यातून 10 हजार 974 व्यक्ती आले असून सर्वांना होम क्वारंटाईन करण्याचे निर्देशित करण्यात आले आहे. भंडारा जिल्हयामध्ये आजपावेतो एकही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेला नाही. जिल्हयात संचारबंदी असल्यामुळे जवाहरनगर नाक्यावर बाहेरुन येणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्याकरीता चार चमु तयार करण्यात आली असून थर्मल स्कॅनद्वारे तपासणी करण्यात येत आहे. जिल्हयाच्या सिमेवरती एकूण 9 चेक पोस्ट तयार करण्यात आले असून प्रत्येक चेक पोस्टवरती वैद्यकीय पथक नेमण्यात आले आहे.
सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रावर सोशल डिस्टंसिंगची मार्किंग करण्याचे कार्य सुरु आहे. नागरिकांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन करून कोरोनाला आळा घालण्यासाठी “मीच माझा रक्षक” या संदेशाचे पालन करावे.
सर्व सहवासितांना प्राऊड टू प्रोटेक्ट भंडारा होम क्वारंटाईन हे स्टॅम्प मारण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष दोन तयार करण्यात आले असून जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक 07184-251222 व जिल्हा सामान्य रुग्णालय -क्रमांक 07184-252247 आणि आरोग्य विभाग, जिल्हा परिषद भंडारा क्रमांक 07184-252317 यावर संपर्क साधावा.