भंडारा - तुमसर तालुक्यातील पवनारखारी गावातील दोन सख्ख्याभावंडांचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी घडली असून विशाल ग्यानिराम शेंडे (वय १४) व खुशाल ग्यानिराम शेंडे (वय १६) दोघेही राहणार पवनारखारी अशी मृत भावांची नावे आहेत.
जनावरांना तलावात पाणी पाजण्यासाठी उतरताना, पाण्याचा अंदाज चुकल्याने दोघेही भाऊ बुडाल्याची प्राथमिक माहिती आहे. हा प्रकार घडताच घटनास्थळावरील उपस्थितांनी बचावाकरिता तलावात उड्या घेतल्या. बाहेर काढून त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र, गोबरवाही येथे नेईपर्यंत दोघेही भाऊ जिवंत होते. मात्र, तत्काळ उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील दोन्ही भावंडांचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सोमवारी पवनारखारी येथील विशाल व खुशाल नेहमीप्रमाणे घरची जनावरे घेऊन चारण्याकरिता गेले होते. गावाबाहेरील भगरू तलावात जनावरांना पाणी पाजण्यासाठी तलावात उतरले. तलाव जुना व पाणी खोल असल्याचा अंदाज या भावंडांचा चुकला. त्यामुळे खोल पाण्यात दोघेही बुडू लागले, वाचवा वाचवा असा आरडाओरड झाला. घटनास्थळावर उपस्थितांनी त्यांना वाचवण्याकरता प्रयत्न केले. दरम्यान, या घटनेची माहिती परिवारासह गोबरवाही पोलिसांना देण्यात आली. अथक प्रयत्नानंतर दोघाही भावंडांना तालावातून बाहेर काढण्यात आले.
प्रत्यक्षदर्शींच्या मते पाण्याबाहेर काढल्यानंतर ते जिवंत होते. क्षणाचाही विलंब न करता विशाल व खुशालला गोबरवाही प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. गोबरवाही येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मुबलक आपत्कालीन सुविधा उपलब्ध नसल्याने त्या दोघांना तुमसर येथे उपचारार्थ हलविण्यात आले. रुग्णवाहिकेतून उपजिल्हा शासकीय रुग्णालय तुमसर येथे जात असताना वाटेतच विशाल व खुशालने अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे तालुक्याच्या ग्रामीण भागातील वैद्यकिय सुविधांचे खुळखुळे चित्र सर्वांसमक्ष आणले आहे. मृत भावंडांच्या परिवारात आई व वडीलच आहेत. या घटनमुळे परिसरात सर्वत्र शोकाकूल वातावरण निर्माण झाले आहे. वेळीच योग्य उपचार मिळाले असते तर दोघांचाही जीव वाचला असता, अशी चर्चा गावात होत आहे.