भंडारा - जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील गोंदेखारी गावामध्ये शनिवारी सकाळी वाघाचे दर्शन झाले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. तसेच नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. विशेष म्हणजे गावकऱ्यांनी वनविभागाच्या मदतीने फटाके फोडून या वाघोबाला जंगलाच्या दिशेने पळवून लावले.
शनिवारी सकाळच्या सुमारास गोंदेखारी गावातील काही नागरिक बाहेर फिरत असताना गावाशेजारी वाघ दिसला. ही माहिती गावात आणि संपूर्ण परिसरात पसरली. त्यामुळे त्याठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी जमली. वाघ असल्याची माहिती तुमसर वनविभागाला दिली असता वनविभागाची चमू अर्ध्या तासात गावात दाखल झाली. तोपर्यंत परिसरात मोठी गर्दी जमली. वाघ हा शेतात लपून बसला असल्याचे दिसले. त्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी जमावाला दूर केले आणि फटाके फोडले. फटाक्यांच्या आवाजाने आणि लोकांच्या आवाजाने शेतात लपलेल्या वाघोबाने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली
सातपुडा पर्वत रांगातील चांदपूर आणि बावनथडीच्या जंगलातून हा वाघ शिकारीच्या शोधत आला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. वाघ जंगलाच्या दिशेने गेला असला तरी सुद्धा गावाशेजारी वाघ दिसल्याने नागरिकांमध्ये विशेषतः शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.