भंडारा - भंडारा तालुक्यातील वरठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सिरसी गावाजवळ परप्रांतीय मजुरांना घेऊन जाणाऱ्या मालवाहू जीपचा पहाटेच्या सुमारास झाला. अपघातात तीन मजुरांचा मृत्यू झाला असून 20 मजूर जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की दोन मृतदेह काढण्यासाठी जेसीवी बोलाविण्यात आले. जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व मजूर बिहार आणि उत्तर प्रदेशवरून कर्नाटक ला कामानिमित्त जात होते.
कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात मजूर गावाकडे परतले. मात्र, गावात रोजगार नसल्याने त्यांच्यावर हळूहळू उपासमार करण्याची वेळ येत आहे. त्यातच लॉकडाऊन शिथिल केल्याने कारखाने सुरू झाले आहेत. मात्र, कारखाने चालविण्यासाठी लागणारे मजूर नसल्याने गावी परत गेलेल्या मजुरांना पुन्हा कारखान्यात परत बोलाविले जात आहे. कर्नाटक राज्यातील बेल्लारी येथील स्टील कंपनीत मजुरांची गरज असल्याने जवळपास 23 मजूरांना बिहार राज्यातून जीपने (टीएस 08 युडी 5329) नेले जात होते. दरम्यान, आज (दि. 29 जुलै) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास भंडारा-तुमसर मार्गावरील दाभा ते सिरसी दरम्यान असलेल्या रेल्वे क्रॉसिंग जवळ चालकाचा गाडीवरली ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. यात चालक अमर उदयभान सिंग (वय 23 वर्षे) व बंटी मनोज तिवारी (वय 27 वर्षे) हे दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर भंडारा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान संतोष मिश्रा (वय 35 वर्षे) या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर अन्य 20 जखमी उपचार घेत आहेत. या 20 लोकांमध्ये त्यांचा ठेकेदार सुद्धा आहे.
घटनेनंतर वरठी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. अपघात एवढा भीषण होता की दोन्ही मृतदेह काढण्यासाठी जेसीबी बोलावून गाडी फोडण्यात आली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक करीत आहेत.
सध्या लॉकडाऊनमध्ये पूर्णपणे शिथीलता आली नाही आणि जिल्हा बंदी ही सुरू आहे. मात्र, असे असताना एकाच गाडीत 23 लोकांना दाटीवाटीने घेऊन जाणे म्हणजे सोशल डिस्टनसिंगचे अजिबात पालन केले जात नव्हते. तसेच या मजुरांना प्रवासासाठी लागणारी परवानगी होती का असा ही प्रश्न निर्माण झाला आहे. कारण एकाच गाडीत 23 लोकांना प्रवास करण्याची परवानगी मिळत नाही, त्यामुळे हे सर्व मजूर कोणतीही परवानगी न घेता प्रवास करीत होते असेच दिसत आहे.