भंडारा - शेतात सध्या रब्बीच्या कामांसोबतच कापूस वेचणी आणि धानाची कापणी सुरू आहे. मात्र शेतात कामासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. मजुरांकडून दुप्पट मजुरीची मागणी केली जात आहे. त्यासोबतच तब्बल 30 ते 40 किलोमीटर अंतरावरून आपल्या शेतात मजूर आणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यासाठी लागणारा वाहतूक खर्चदेखील शेतकरी करत असल्याने, त्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
शेतकऱ्यांना वर्षभर वेगवेगळ्या संकटांचा सामना करावा लागतो. कधी अतिवृष्टी तर कधी कोरडा दुष्काळ, पिकांवर होणारा रोगांचा प्रार्दुभाव अशा विविध संकटांचा सामना करत शेतकरी उत्पन्न घेत असतो. भंडारा जिल्ह्यात धानाचे पीक यावर्षी चांगले आले होते. मात्र अतिवृष्टीचा फटका या पिकाला बसल्याने पीक हातचे गेले. त्यातून जे पीक वाचले त्याच्यावर देखील रोगाचा प्रार्दुभावर झाला आणि आता धानाच्या पिकात रानडुकरांचा उपद्रव वाढल्याने शेतकऱ्यांनी अचानक धान कापणीचा निर्णय घेतला.
एकाचवेळी धान कापणीला सुरुवात झाल्यामुळे मजुरांचा तुटवडा जाणवत आहे. मजुरांचा तुटवडा असल्यामुळे मजुरीचे दर देखील दुप्पट वाढले आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांना 30 ते 40 किलोमीटरच्या परिसरातून आपल्या शेतात कामासाठी मजूर आणावे लागत आहेत. त्यांचा वाहतूक खर्च देखील शेतकरीच करतात, त्यामुळे शेती तोट्यात जाताना दिसत आहे. रानडुकरांनी शेतातील धान आडवे केल्याने, जे धान काढण्यासाठी एका दिवसाचा कालावधी लागायचा तिथे दोन दिवसांचा कालावधी लागतो आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. यंदा धान शेतीत तोटा झाल्याचे शेतकरी सांगत आहेत.
हेही वाचा - पैठणमध्ये इंडिया बँकेचे एटीएम मशीन गायब... पहाटेच्या अंधारात डाव
हेही वाचा - भाजपा आमदार प्रशांत बंब यांच्यावर गुन्हा दाखल, कारखान्याच्या सभासदांची फसवणूक केल्याचा आरोप