भंडारा - संपूर्ण शहराचे लक्ष ज्या गाडी चालकाच्या अहवालाकडे लागून होते, त्याचा कोरोना अहवाल गुरुवारी निगेटिव्ह आला आहे. 16 तारखेला पुण्यावरून आलेल्या 2 जेष्ठ नागरिकांना कोरोना झाल्याचे पुढे आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. हे दोघेही ज्या खासगी गाडीने आले होते. तिच्या चालकासह 22 लोकांना क्वारन्टाईन करण्यात आले होते. तेव्हापासून भंडारा शहरातील लोकांचे लक्ष या चालकाच्या कोरोना अहवालाकडे लागून होते.
भंडारा जिल्हा कोरोना मुक्त झाल्यानंतर 16 मेला पुण्याहून आलेल्या दोन ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची बाधा झाल्याचे अहवाल मिळाले होते. यानंतर प्रशासनाने नागरिकांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेतला. भंडारा शहरात राहणाऱ्या या दोन्ही ज्येष्ठ नागरिकांना पुण्यावरून ज्या चालकाने आपल्या गाडीत आणले, तोही भंडारा शहरातील होता. तो 14 ते 16 मे या दोन दिवसात त्यांच्या कुटुंबासह राहिला. तसेच शहरातही विविध ठिकाणी फिरला होता. त्यामुळे त्याला इन्स्टिट्युशनल क्वारन्टाईन करण्यात आले. त्याच्यामध्ये कोरोनाची कोणतीच लक्षणे दिसत नसल्याने त्याचा अहवाल उशिरा पाठविला गेला.
हेही वाचा - 'भाजपने कोरोनाबाबत राजकारण करण्यापेक्षा खडसेंना 'क्वारंटाईन' का केलं, याचं उत्तर द्यावं'
गुरुवारी त्या चालकाचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. दरम्यान, पुन्हा 6 लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. मात्र, हे सर्व रुग्ण मुंबई वरून आलेले होते. तर जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 9 आहे. 1 कोरोना मुक्त झाला आहे. तसेच 8 लोकांवर उपचार सुरू आहेत. भंडारा जिल्ह्यातून आतापर्यंत 1061 स्वॅब तपासणीसाठी पाठविलेले होते. यापैकी 980 नमुने निगेटिव्ह आले असून 72 अहवाल अप्राप्त आहेत.