भंडारा - कंपनी व्यवस्थापनाच्या आडमुठे धोरणाच्या विरोधात जवळपास 2 हजार कायम आणि कंत्राटी कामगारांनी 16 मार्चपासून पुकारलेला संप अखेर संपला. कामगारांच्या सर्व मागण्या व्यवस्थापनाने मान्य केल्या. भंडारा-गोंदियाचे खासदार सुनील मेंढे यांची भूमिका यात महत्त्वाची राहिली. देशाच्या पोलाद मंत्र्यांच्या कानावर हा विषय टाकला होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे ही हा विषय नेण्यात आला. नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत दोन दिवस स्वतः खा. सुनील मेंढे, कंपनीचे मालक भारद्वाज, व्यवस्थापनाचे अधिकारी गुप्ता, श्रीवास्तव, कामगार संघटनेचे नेते मिलिंद देशपांडे यांच्यात बैठक होऊन चर्चा झाली.
मागच्या तीन वर्षांपासून मागण्या अपूर्ण
भंडारा जिल्ह्याच्या वरठी गावात सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीतील कर्मचाऱ्यांची मागण्यांकडे कंपनी व्यवस्थापन दुर्लक्ष करीत होते. कामगारांच्या पगारात वाढ संदर्भात त्रैवार्षिक कराल व दिवाळी बोनस अशा विविध मागण्या नेहमीचे होत्या. कंत्राटी कामगारांना किमान वेतन, यासह अनुभवानुसार स्थायी कामगार करणे व भविष्य निर्वाह निधी कपात करणे या नेहमीच्याच मागण्या होत्या. मात्र व्यवस्थापनाच्या आडमुठे धोरणामुळे कंपनीतील जवळपास दोन हजार कर्मचारी यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता.
सनफ्लॅग कंपनीतील कामगारांचा संप मिटला कंपनीला पत्र देऊन ही तोडगा न निघाल्याने संप पुकारला मागील तीन महिन्यांपासून नियमित कामगार आणि कंत्राटी कामगार यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने संपाच्या पहिले पंधरा दिवसात मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर संपूर्ण कर्मचारी संपावर जातील, असे पत्र ही दिले. मात्र कंपनीने याकडे दुर्लक्ष केले आणि म्हणून कंपनीतील 2 हजार कायम आणि कंत्राटी कर्मचारी 16 मार्च पासून संपावर गेले होते.
खासदार आणि आमदार यांच्या मध्यस्तीला कंपनीने डावलले
सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीचे सर्व कामगार बेमुदत संपावर गेल्यानंतर पहिल्याच दिवशी स्थानिक आमदार राजू कारेमोरे यांनी आंदोलनस्थळी भेट घेत कामगारांशी चर्चा केली आणि यानंतर कामगारांच्या शिष्टमंडळाला घेऊन कंपनी व्यवस्थापन सोबतही बैठक घेऊन चर्चा केली. मात्र कंपनी व्यवस्थापन आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने चर्चा व्यर्थ ठरली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी खासदार सुनील मेंढे यांनीसुद्धा आंदोलनस्थळी भेट देत कंपनीच्या व्यवस्थापना सोबत चर्चा केली. मात्र तेव्हाही तोडगा निघाला नाही.
शेवटी नितीन गडकरी त्यांच्या मध्यस्थीने तोडगा निघाला
कंपनी त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याने हे आंदोलन वाढत जात होते. त्यामुळे खासदार सुनील मेंढे यांनी मध्यस्थीची भूमिका घेत पहिले कंपनीच्या मालकांशी, उद्योग मंत्री यांच्याशी दिल्ली येथे बैठक केली. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे खासदार सुनील मेंढे, कामगार संघटनेचे कायदेशीर सल्लागार अॅड. मिलिंद देशपांडे, कंपनीचे मालक प्रणव भारद्वाज, एस के गुप्ता व सतीश श्रीवास्तव यांच्यासह दोन्ही संघटनेच्या प्रतिनिधींची दोन दिवस बैठक झाली आणि त्यानंतर कंपनीने कामगारांच्या सर्व मागण्या मान्य केल्याचे सांगितले. तेव्हा कामगारांनी हा संप मागे घेतला.