भंडारा - जिल्ह्यात पहिल्यांदाच होत असलेल्या राज्यस्तरीय शालेय बॉल बॅडमिंटन स्पर्धेला आज (गुरुवार) पासून सुरुवात झाली. या स्पर्धेची उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साबळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली. मात्र, या उद्धाटनाला खासदार, पालकमंत्री तसेच आमदार या सर्वांनी पाठ फिरवली.
उद्घाटनानंतर बोलताना साबळे म्हणाले, 'खेळामुळे शरीर सुदृढ राहते आणि आमच्या देशाचा भविष्य हा नेहमी शारीरिकदृष्ट्या सुदृढ राहावं. यासाठी खेळणे अतिशय महत्वाचे आहे.'
दरम्यान, ही स्पर्धा नऊ तारखेपर्यंत रंगणार असून या स्पर्धेत महाराष्ट्राच्या आठ प्रशासकीय विभागातून ३६ जिल्ह्यातील ४८ संघानी सहभाग दर्शवला आहे. यात सहभागी ५५० खेळाडूमध्ये २२५ मुली आणि २२५ मुले सहभागी झाले आहे. १४, १७ आणि १९ वर्षाखालील अशा गटामध्ये सामने खेळले जाणार आहेत.
या सामन्यांसाठी ६ मैदाने तयार करण्यात आली आहेत. एका वेळेस या सहाही मैदानात तिनही वयोगटातील मुलामुलींचे सामने खेळविले जात आहेत. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर बॉल बॅडमिंटन स्पर्धा घेतली जात आहे. मात्र, या स्पर्धेला प्रेक्षकांचा प्रतिसात मिळत नसल्याचे दिसत आहे. आंध्र प्रदेशमध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी या स्पर्धेतून महाराष्ट्राचे संघ निवडले जाणार आहेत.