भंडारा - जिल्ह्यात एकही कोरोनाग्रस्त रुग्ण नसल्याने छोट्या व्यापाऱ्यांना आणि मजुरांना रोजगार निर्मितीसाठी वाढवलेल्या लॉकडाऊन दरम्यान शिथिलता द्यावी, अशी मागणी भंडारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना केली आहे.
भंडारा जिल्ह्यातील धान (भात) उत्पादक शेतकरी, शेतमजूर, पदपथ व्यावसायिक, कलाकार, बेरोजगार यांची संचारबंदीमुळे वाताहत झाल्याची माहिती आमदार भोंडेकर यांनी दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात आणि देशात वाढत चालला आहे. महाराष्ट्र शासनाने लॉकडाऊन अवधी वाढवून 30 एप्रिलपर्यंत केला आहे. पण भंडारा जिल्ह्यात सध्यातरी एकही रुग्ण नाही आहे.
ज्याप्रमाणे पहिल्या लॉकडाऊनच्या काळात सीमा बंदी केली गेली, त्यापेक्षाही कठोर पद्धतीने सीमाबंदीच्या नियमांची अंमलबजावणी केल्यास कोरोनाग्रस्त जिल्ह्यातून किंवा राज्यातून कोणीही संक्रमित रुग्ण येणार नाही आणि जिल्हा शेवटपर्यंत कोरोना मुक्त राहील. पहिल्या संचारबंदीमुळे आर्थिक दृष्ट्या जिल्ह्यातील जे छोटे व्यापारी, विविध क्षेत्रातील मजूर अडचणीत सापडले आहेत, त्यांना या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी जमावबंदी, सोशल डिस्टनसिंग, मास्क वापरणे यासारख्या नियमांचे पालन करीत जिल्ह्यात शिथिलता दिली, तर व्यापारी, मजूर, पदपथ विक्रेते यांच्यावरील आर्थिक संकट कमी होऊ शकेल. त्यामुळे वाढवलेल्या लॉकडाऊनच्या काळात मुख्यमंत्र्यांनी भंडारा जिल्ह्याला काही प्रमाणात शिथिलता द्यावी, अशी मागणी भंडारा मतदारसंघाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केली आहे.