भंडारा - विधानसभा अध्यक्ष कोण होईल? याचा निर्णय तिन्ही पक्षाच्या बैठकीनंतर ठरेल, असे माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले. तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित येऊन त्याविषयी निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले. यावरून विधानसभा अध्यक्षपद हे सहजासहजी राष्ट्रवादीही सोडायला तयार नाही, असे म्हणता येईल.
केवळ काँग्रेस मुख्य दावेदार नाही -
महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष पद हे काँग्रेसला देण्यात आले होते. नुकतेच विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदावर आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेचेची नजर आहे. तर दुसरीकडे हे पद आमचे होते आणि आमच्याच काँग्रेस पक्षातील व्यक्ती हा विधानसभा अध्यक्ष बनेल, असा कॉंग्रेसचे म्हणणे आहे. मात्र, असे असले तरी याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रफुल्ल पटेल यांना विचारले असता विधानसभा अध्यक्षपदाबाबत सध्या तरी कोणताही ठराव झालेला नाही. तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित येऊन त्याविषयी निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले. यावरून, विधानसभा अध्यक्षपद हे सहजासहजी राष्ट्रवादीही सोडायला तयार नाही, असे म्हणता येईल. या विधानानंतर काँग्रेसला हे पद राखण्यासाठी मोठी कसरत करावी लागेल असेच दिसत आहे.
हेही वाचा - कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली नाही तर, लोकल ट्रेनच्या वेळेत बदल - वडेट्टीवार
काँग्रेसच्या मंत्र्यांना मिळतो आहे दुजाभाव -
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात शिवसेनेचे संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भूमिका मुख्य होती. त्यांनी हे महाआघाडीचे सरकार स्थापन केले. त्यामुळे मंत्रिमंडळामध्ये शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला हवी असलेली पदे मिळाली. तर काँग्रेसला मिळालेली मंत्रिपदे हे खूप महत्त्वाचे नसून काँग्रेसच्या मंत्र्यांना दुहेरी वागणूक मिळत असल्याचा आरोप बरेचदा होतो. याविषयी भाष्य करणे योग्य होणार नाही, असे पटेल म्हणाले. तर याविषयी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य करणे योग्य ठरेल. हा शासनाचा विषय असून कोणावरही भेदभाव केला जात नाही आणि जर काही कमी-जास्त विषय असेल तर तो नक्कीच दूर केल्या जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष पदावर काँग्रेस सतत दावा करीत असला तरी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेलांच्या वक्तव्यावरून हे पद सध्या तरी केवळ काँग्रेसच्या खात्यात आहे, असे म्हणणे योग्य होणार नाही.