भंडारा - जिल्ह्यात ऑगस्ट महिन्याच्या शेवटी आलेल्या महापुरात भंडारा तालुक्यातील बेला-कोरंभी हा रस्ता पुराच्या पाण्यात वाहून गेला. एक महिना आटोपला आहे. मात्र, अजूनही हा रस्ता बांधला गेला नाही. त्यामुळे नागरिकांना विशेषतः शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. नागरिकांना जवळपास 10 किलोमीटर फिरून जावे लागत आहे. या रस्त्याचे दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. काही तांत्रिक अडचणी निर्माण झाली आहे. त्या लवकरच दूर करून काम पूर्ण केले जाईल, असे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी सांगितले.
भंडारा जिल्ह्यात ऑगस्ट महिन्याच्या 28 ते 30 तारखेला महापूर आला होता. या महापुरात अनेक गावात, शेतात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सर्वाधिक नुकसान हे भंडारा तालुक्यात झाले. तालुक्यातील बेला-कोरंबी हा डांबरी रस्ता पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. रस्ता वाहून गेल्याने शेतकऱ्यांना शेतीवर जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. अनेक शेतकऱ्यांना शेतावर बैलगाडी नेताच येत नाही. तर शेतकऱ्यांना शेतात खत मारायचे असेल तर 10 किलोमीटर फिरून जावे लागत आहे. रस्ता वाहून गेल्यानंतर याची माहिती जिल्हा प्रशासनाला देण्यात आली होती. मात्र, महिना लोटून गेल्यावरही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे बेला ग्रामपंचायतीने या रस्तावर तात्पुरता मुरूम घालून पांदण छोटीशी पांदण तयार करण्यात आली. मात्र, यावरून दुचाकी घेऊन जाणे अतिशय जोखमीचे आहे. त्यात पाऊस आला की या रस्तावर चालणेही अवघड होत आहे.
रस्ता दुरुस्ती करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. मात्र, अजूनही रस्ता निर्मितीच्या कामाला सुरुवात झाली नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. तर शेतीवर जाण्यासाठी ही मोठी जोखीम घेऊन जावे लागत आहे. त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर बनवावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, याविषयी जिल्हाधिकारी संदीप कदम यांना विचारणा केली असता ते म्हणाले, काही तांत्रिक अडचणींमुळे रस्त्याचा काम अपूर्ण आहे. येत्या काही दिवसात या तांत्रिक अडचणी दूर करून रस्त्याचा काम सुरु करून पूर्ववत करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.