भंडारा - जिल्ह्यात १३ दिवसानंतर पावसाचे जोरदार पुनरागमन झाले आहे. गुरुवारी पहाटेपासून पाऊस संततधार सुरू आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार भंडारा जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, मोहाडी आणि लाखनी या चार तालुक्यांमध्ये गुरुवारी मुसळधार पाऊस बरसणार असल्याची शक्यता वर्तविली आहे. या पावसामुळे रखडलेल्या पेरणीची काम पुन्हा सुरू होतील. तर जी पिके पावसाअभावी जळत होती त्यांना नवीन जीवनदान मिळणार आहे. या पावसामुळे शेतकरी वर्ग प्रफुल्लित झाला असून सर्वसामान्य नागरिकांनाही उकाड्यापासून सुटका मिळणार आहे.
- पहाटेपासून सर्वदूर पाऊस -
हवामान खात्याच्या अंदाजानुसार 2021 मध्ये चांगला पाऊस पडणार आहे. मात्र भंडारा जिल्ह्यात जून महिन्याच्या सुरुवातीला काही दिवस पाऊस बरसला. त्यानंतर 25 तारखेपासून पावसाने दांडी मारली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी लावलेले पिके हे जळत होते. तर ज्या शेतकऱ्यांकडे काही प्रमाणात पाण्याची व्यवस्था होती त्यांनी पेरणी केल्या होत्या ते पीक ही कारपायला लागले होते. त्यांच्या शेतातही मोठमोठ्या भेगा पडल्या होत्या. गुरुवारी पहाटेपासून सुरू झालेला पाऊस अगदी शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे आहे. सकाळपासुन कधी संततधार, कधी रिमझिम तर कधी मुसळधार पाऊस बरसतो आहे. या पावसामुळे सर्व पिकांना नवीन जीवदान मिळणार आहे. रखडलेल्या पेरणीच्या कामाला पुन्हा सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास घेतला आहे.
- आतापर्यंत केवळ 2000 हेक्टरमध्ये पेरणी -
भंडारा जिल्हा हा धानाच्या जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यामध्ये एक लाख 83 हजार 145 हेक्टरवर धानाची लागवड होते. यापैकी 13 हजार 560 हेक्टरमध्ये रोपवाटिका नर्सरीच्या माध्यमातून लागवड केली जाते. तर एक लाख 62000 हेक्टरवर खरीप भाताची रोहिणी केली जाते. आतापर्यंत केवळ दोन हजार हेक्टर वरच पेरणी झाली होती. उर्वरित क्षेत्रामध्ये शेतकरी पेरणीची वाट पाहत होते. गुरुवारी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाली असून जर पाऊस असाच राहिला तर लवकरच जिल्ह्यातील पेरणीचे काम पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे.
- जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता -
गुरुवारी पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाली. कधी रिमझिम तर कधी मुसळधार पाऊस बरसला. त्यानंतर दुपारी बारा वाजता हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार गुरुवारी भंडारा जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, मोहाडी आणि लाखणी तालुक्यात मुसळधार पाऊस बरसणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे. मागील तेरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने वातावरणात चांगलाच उकाडा निर्माण झाला होता. गुरुवारी झालेल्या पावसामुळे वातावरणात थंडावा निर्माण झाल्याने नागरिकांना या उकड्यापासून निश्चितच सुटका मिळाली आहे.