भंडारा - तुमसर विधानसभा क्षेत्रातील आजी-माजी आमदारांनी एकमेंकावर भ्रष्टाचाराचे आरोप-प्रत्यारोप केले. आमदार राजू कारेमोरे यांनी माजी आमदारांना 'पिसाळलेले श्वान' अशी उपाधी दिली आहे. तसेच ज्याच्या मनात जसे विकार असतील, त्यांना संपूर्ण जग हे तसेच दिसते. त्यामुळे अशा लोकांच्या आरोपांचा अजिबात विचार केला जाऊ नये, असे राजू कारेमोरे म्हणाले.
जिल्ह्यात मागील तीन महिन्यांपासून धान खरेदी केंद्राचा विषय सातत्याने सुरू आहे. नवीन धान्य खरेदी केंद्र देताना नियमाची पायमल्ली केली असल्याचा आरोप तुमसर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी केला. या वर्षी नवीन 25 खरेदी केंद्रांना जिल्हा मार्केटिंग अधिकारातर्फे परवानगी देण्यात आली. ज्या संस्था ब वर्गाचे सभासद होण्याच्या निकषामध्ये बसत नाहीत. त्यांनाही राजकीय दबावापोटी धान खरेदी केंद्र उघडण्याची परवानगी देण्यात आली, असा आरोप त्यांनी केला.
चरण वाघमारे यांनी लावलेल्या आरोपांवर आमदार राजू कारेमोरे यांनी प्रितक्रिया दिली. वाघमारे हा एक पिसाळलेला श्वान आहे. त्याच्या आरोपांकडे गांभीर्याने पाहू नये, असे कारेमोरे म्हणाले. हे आरोप अतिशय खोटे असून मार्केटिंग अधिकारी हे नियमानुसारच संस्थांना खरेदीचे अधिकार देतात. नव्याने निर्माण केलेल्या संस्थांमध्ये वेगळी हमाली घेतली जात नाही. शेतकऱ्यांचा मालाचा 24 तासात काटा केला जातो. इथे शेतकऱ्यांची लूट होत नाही. तर या उलट मागील तीन वर्षापूर्वी सुरू झालेल्या धान खरेदी केंद्रांवर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची लूट होत आहे, असा आरोप त्यांनी लावला.
आम्ही नव्याने परवानगी दिलेल्या खरेदी नियमानुसार असून यावर कोणतेही लूट होत नाही. ज्या माणसांच्या मनात असे विकार असतील त्या माणसाला जगही तसेच दिसते, असा टोला त्यांनी चरण वाघमारे यांनी लावला.