भंडारा - जिल्ह्यातील काही तालुक्यात शनिवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. मात्र हा पाऊस केवळ 15 ते 20 मिनिटे बरसला.
मागील 3 दिवसांपासून दररोज संध्याकाळच्या दरम्यान वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण निर्माण होत होते. आजसुद्धा दिवसभर उन तापले होते. मात्र, नंतर सायंकाळी ढगाळ वातावरण झाले आणि काहीच वेळात मोठ्या प्रमाणात वारे वाहू लागले. यानंतर भंडारा तालुक्यात रिमझिम पाऊस पडला.
मात्र मोहाडी, तुमसर या तालुक्यांमध्ये पावसाच्या मोठ्या सरी बरसल्या. 15 ते 20 मिनिटे हा पाऊस चालला. शेतकऱ्यांना अपेक्षित असा हा पाऊस झाला नाही. या पावसामुळे वातावरणात काही प्रमाणात थंडावा निर्माण झाले आहे. शेतकरी राजा मात्र, अजूनही मान्सूनच्या पावसाची वाट पाहत आहे.