भंडारा - एका पोलीस कर्मचाऱ्याने अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. नीलेश हेडाऊ असे या आरोपी पोलिसाचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
लाखनी तालुक्यात दोन दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणाचा तपास करताना आरोपी हा गोंदियातील चिंचगड पोलीस ठाण्याचा कर्मचारी असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. भंडारा पोलिसांनी तत्काळ आरोपीला अटक केली.
हेही वाचा - फेसबुकच्या माध्यमातून मैत्री करून अल्पवयीन मुलीला ओढले प्रेमाच्या जाळ्यात, नंतर...
पीडित मुलगी ही लाखनी येथे बारावीत शिकत आहे. 9 फेब्रूवारीला दुपारी कॉलेज आटपून गडेगाव येथे राष्ट्रीय महामार्ग सहावर मैत्रीणीसह उभी होती. दरम्यान मैत्रीणीचे मामा आल्याने मैत्रीण निघून गेली. पीडित मुलगी एकटी उभी असताना एक पांढरी कार तिच्या समोर येऊन थांबली. गाडीतील व्यक्तीने भंडाऱ्याला जाणारा रस्ता कोणता आहे, अशी विचारणा केली. त्यानंतर मुलीला विश्वासात घेऊन तिलाही गाडीत बसवले.
मुलगी गाडीत बसतात त्याने तिची छेड काढण्यास सुरुवात केली. पीडितेने प्रतिकार करुन गाडीचे स्टेअरिंग फिरवल्याने गाडी दुभाजकावर आदळली. त्यामुळे आरोपीने मुलीला रस्त्याच्या कडेला फेकून दिले आणि पसार झाला. पीडितेने याबाबत लाखनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. आरोपीने मुलीला स्वतः पोलीस असल्याचे सांगितले होते. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणात लक्ष देत सहा पथकं आरोपीच्या शोधासाठी तयार केले. पोलिसांनी तांत्रिक तपास करुन आरोपी नीलेश हेडाऊ याचा शोध लावाला. स्वतः पोलीसच आरोपी निघाल्याने नागरिकांनी कोणाकडे मदत मागावी, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.