भंडारा - शहरातून नवीन राष्ट्रीय महामार्ग जात आहे. मात्र, यातील जवळपास एक किलोमीटरचे काम मागील वर्षभरापासून थांबलेले आहे. त्यामुळे बंद पडलेले काम सुरू करावे या मागणीसाठी काँग्रेस आणि शहरातील नागरिकांतर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी नितीन गडकरी यांच्याविरुद्ध घोषणा देत रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली.
हेही वाचा- 'आईनेच दिला मराठीचा पहिला धडा'; फ्रान्सिस दिब्रिटो यांची विशेष मुलाखत
जिल्हा परिषद ते खात रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग शहरातून गेला आहे. मात्र, खात रस्त्यावरील रेल्वे लाईनपासून बीएसएनएल कार्यालयापर्यंत जवळपास 1 किमीच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम थांबलेले आहे. रस्त्याची निर्मिती करताना बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण असल्याने हे काम मागील वर्षभरापासून थांबलेले होते. या रस्त्याची आता अक्षरशः चाळण झाली आहे. वाहतुकीसाठी हा रस्ता धोकादायक झाला आहे. खराब रस्त्यामुळे आतापर्यंत बरेचदा अपघातही झाले आहेत. मात्र, असे असले तरी हा रस्ता बनवण्याचे किंवा डागडुजी करण्याच्या दृष्टीने नगरपालिका, राष्ट्रीय महामार्ग विभाग यांच्यापैकी कोणीही प्रयत्न करीत नसल्याने नागरिक संतापले आहेत.
हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने याची देखरेख राष्ट्रीय महामार्गाच्या अंतर्गत केली जाते. मात्र, याचे कार्यालय भंडारा जिल्ह्यात नसल्याने नेमके कोणत्या कारणामुळे रस्त्याचे काम थांबले आहे, ते कधी सुरू होणार याविषयी कोणीही सांगत नाही. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी काल (मंगळवारी) या रस्त्यावर आंदोलन केले. यावेळी नितीन गडकरी यांच्या प्रतिकात्मक फोटोला हार घालून त्यांच्याविरुद्ध घोषणा देण्यात आल्या. तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकार्यांविरुद्धही घोषणा देऊन राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम लवकरात-लवकर सुरू करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.