मुंबई : 2024 वर्ष हे खूप धमाकेदार प्रत्येकासाठी ठरलं आहे. चालू वर्षात बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी आपल्या आयुष्याचा नवीन अध्याय सुरू केला. या यादीत सोनाक्षी सिन्हा-जहीर इक्बाल, शोभिता धुलिपाला-नागा चैतन्यपर्यंतचे स्टार्स आहेत, ज्यांनी यावर्ष लग्न करून चाहत्यांना एक सुंदर भेट दिली. आज अशाच काही स्टार्सबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्यांनी यावर्ष लग्न केलं.
सोनाक्षी सिन्हा- जहीर इकबाल : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि जाहिर इक्बाल यांनी 23 जून रोजी कुटुंबीय आणि जवळच्या मित्रपरिवाराच्या उपस्थितीत विवाह केला. चार वर्षे डेटिंग केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. या जोडप्याचा विवाह शिल्पा शेट्टीच्या बास्टियन या रेस्टॉरंटमध्ये पार पडला.
अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ : अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ यांनी सप्टेंबर 2024 मध्ये तेलंगणातील श्री रंगनायकस्वामी मंदिरात लग्न केलं. हा विवाह सोहळा खूप खास आणि खासगी होता. या विवाहसोहळ्यात मोजके लोक उपस्थित होते. दरम्यान अदिती आणि सिद्धार्थनं नोव्हेंबरमध्ये राजस्थानमधील उदयपूरला दुसऱ्यांदा हिंदू रितीरिवाजांनुसार सात फेरे घेतले.
आयरा खान-नुपूर शिखरे: वर्षाच्या सुरुवातीला आमिर खानची मुलगी आयरा खाननं 3 जानेवारी रोजी बॉयफ्रेंड नुपूरबरोबर नोंदणीकृत विवाह केला. यानंतर आयराचा उदयपुरमधील लेक सिटीमध्ये शाही पद्धतीनं विवाह संपन्न झाला. यानंतर या जोडप्यानं बॉलिवूडमधील स्टार्ससाठी मुंबईतही रिसेप्शनही आयोजित केले होते.
रकुलप्रीत सिंग-जॅकी भगनानी: बॉलिवूड स्टार रकुलप्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांनी 21 फेब्रुवारीला गोव्यातील आयटीसी ग्रँडमध्ये लग्नगाठ बांधली. रकुल आणि जॅकीच्या लग्नाला शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, वरुण धवन, नताशा दलाल आणि भूमी पेडणेकर यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या जोडप्याचा विवाह खूप चर्चेत राहिला होता.
तापसी पन्नू- मॅथियास बो : अभिनेत्री तापसी पन्नूनं बॉयफ्रेंड माजी बॅडमिंटनपटू मथियास बो यांच्याबरोबर उदयपूरमध्ये कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थित 23 मार्च 2024 रोजी विवाह केला. मात्र एका मुलाखतीत तापसीनं सांगितलं की तिचं अधिकृत लग्न डिसेंबर 2023 मध्ये झालं होतं.
शोभिता धुलिपाला-नागा चैतन्य : साऊथ स्टार्स शोभिता धुलिपाला आणि नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य हे यावर्षी 4 डिसेंबरला लग्नबंधनात अडकले. या जोडप्याचा विवाह खूप शाही पद्धतीनं करण्यात आला. दरम्यान नागा चैतन्यचा पहिला विवाह समांथा रुथ प्रभुशी झाला होता.
कीर्ती सुरेश-अँटोनी थाटील : साऊथ अभिनेत्री कीर्ती सुरेशनं 12 डिसेंबर रोजी गोव्यात बॉयफ्रेंड अँटोनी थाटीलबरोबर लग्न केलं. हा विवाह हिंदू रितीरिवाजानुसार पार पडला. आता तीन दिवसांनंतर या जोडप्यानं ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार लग्न केलंय.
आलिया कश्यप-शेन ग्रेगोयर : अनुराग कश्यपची मुलगी आलियानं 11 डिसेंबरला बॉयफ्रेंड शेन ग्रेगोयरबरोबर सात फेरे घेते. या विवाह सोहळ्यात बॉलिवूडमधील काही स्टार्सनं हजेरी लावली होती.
पुलकित सम्राट-क्रिती खरबंदा : बॉलिवूड स्टार पुलकित आणि क्रितीनं 15 मार्च रोजी लग्न केलं. गुलाबी रंगाच्या लेहेंग्यात क्रिती खूपच सुंदर दिसत असून यावेळी पुलकितनं हिरव्या रंगाची शेरवानी घातली होती. या जोडप्याचं लग्न देखील शाही पद्धतीनं करण्यात आलं होतं.
आरती सिंग-दीपक चौहान : टीव्ही अभिनेत्री आरती सिंहनं 25 एप्रिल 2024 रोजी मुंबईतील उद्योगपती दीपक चौहानबरोबर लग्नगाठ बांधली. या पारंपारिक समारंभात जवळचे मित्र आणि कुटुंबातील काही सदस्य उपस्थित होते.