भंडारा- जिल्ह्याला पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रिपद मिळावे, अशी मागणी जोर धरत आहे. नाना पटोले यांच्या समर्थकांनी काँग्रेस नेते नाना पटोले यांना कॅबिनेट मंत्रिपद देऊन नाना पटोले आणि भंडारा जिल्ह्याला योग्य तो मान मिळावा, अशी मागणी केली आहे. नाना पटोले शेतकरी ओबीसी नेते समजले जातात. तसेच ते किसान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षही आहेत. त्यांच्याकडे समाजकारणाचा, राजकारणाचा मोठा अनुभव सुद्धा आहे. त्यामुळेच त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळायला हवे, अशी मागणी त्यांच्या समर्थकांनी केली आहे.
हेही वाचा- 'महाराष्ट्रातील लहान भावाला पंतप्रधानांनी साथ द्यावी'
पंचायत समितीच्या निवडणुकीपासून नाना पटोले यांनी आपल्या राजकारणाला सुरुवात केली होती. मागील ३० वर्षांपासून त्यांनी राजकारणात बरेच चढ-उतार बघितले आहेत. मधल्या काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस सोडून ते भाजपमध्ये गेले होते. मात्र, भाजपमधे शेतकरी आणि ओबीसी यांच्या बाबतीत ठोस निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी घेत नाहीत, असा आरोप करीत यांनी भाजपला रामराम ठोकला. त्यानंतर ते संपूर्ण देशभर चर्चेत राहिले. लोकसभेत नितीन गडकरी विरुद्ध निवडणूक लढविली. त्या निवडणुकीत ते हरले.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने त्यांना प्रचार प्रमुखाची जबाबदारी दिली होती. मात्र, साकोली विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढविताना त्यांना ती जबाबदारी पार पाडता आली नाही. कारण त्यांना हरविण्यासाठी भाजपतर्फे मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय असलेले आणि भंडारा गोंदियाचे पालकमंत्री परिणय फुके यांना रिंगणात उभे करण्यात आले होते, तर फुके यांच्या प्रचारासाठी पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची साकोली येथे एक मोठी सभा ठेवण्यात आली होती. मात्र, भाजपने केलेले सर्व प्रयत्न निष्फळ ठरवून नाना पटोले यांनी त्यांच्या क्षेत्रात अजून तरी त्यांना कोणी हरवू शकत नाही हेच पुन्हा दाखवून दिले.
सर्वसामान्य लोकांचा, शेतकऱ्यांचा नेता, एक चांगला वक्ता, राजकारणाचा अभ्यासक, अशी नाना पाटोले यांची ओळख आहे. तसेच आजपर्यंत भंडाऱ्याला कोणतेही कॅबिनेट मंत्रिपद मिळालेले नाही. त्यामुळे हीच खरी आणि योग्य वेळ असल्याने नाना पटोले यांना कॅबिनेट मंत्रीपद आणि पालकमंत्रिपद देऊन या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी उद्धव ठाकरे यांनी हातभार लावावा, अशी मागणी नाना पटोले यांच्या समर्थकांनी केली आहे.