भंडारा - सीबीएसई बोर्डाच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा शासनाच्या निर्देशांचे पालन करत नसल्याचे उघडकीस आले आहे. एनसीईआरटी पुस्तकानुसार अभ्यास घेणे गरजेचे असूनही अन्य प्रकाशनाची पुस्तके घेण्यात येत आहेत. या शाळांच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी कारवाई करण्याची मागणी संतप्त पालक करत आहेत. यासाठी आज खासदार सुनील मेंढे यांना घेराव घालत त्यांना निवेदन देण्यात आले.
शाळांमध्ये कोणत्याही प्रकारची शैक्षणिक साहित्य विक्री करण्यास बंदी असताना देखील त्याचे सर्रासपणे उल्लंघन होत आहे. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक वर्ग व मुख्याध्यापक यांची नियुक्ती करताना शिक्षण विभागाची मंजुरी घेण्यात आली नाही. त्यामुळे संस्थाचालकांच्या मर्जीने कारभार सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या सर्व प्रकाराविषयी शिक्षणाधिकारी यांना पालकांनी अनेकदा तक्रारी केल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे पालकांमध्ये असंतोष आहे. शिक्षणाधिकारी कोणतेही पाऊल उचलत नसल्याने पालकांनी थेट खासदार सुनील मेंढे यांचे कार्यालय गाठले. यावेळी त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
विशेष म्हणजे खासदार सुनील मेंढे यांची देखील एक खासगी सीबीएसई शाळा आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी दिलेल्या निवेदनावर खासदार सुनील मेंढे किती गांभीर्याने विचार करतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे.