भंडारा - बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबरला मतदान पार पडले. 288 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत कैद झाले. राज्यात सरासरी 60 टक्के मतदान झाले. भंडारा जिल्ह्यातील तीन मतदारसंघात एकूण 66.73 टक्के मतदान झाले.
2014च्या विधानसभा निवडणुकीत भंडाऱ्यातील तीनही मतदारसंघात भाजपचा वरचष्मा राहिला होता. साकोली विधानसभा मतदारसंघात भाजपच्या राजेश काशीवार यांनी काँग्रेसच्या सेवक वाघाये यांचा 25 हजार मतांनी पराभव करत विजय मिळवला होता.
तुमसर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मधुकर कुकडेंना भाजपच्या चरण वाघमारे यांच्या कडून पराभूत व्हावे लागले होते.
भंडारा विधानसभा मतदारसंघात भाजपच्या रामचंद्र आवसारे यांनी 83 हजार 408 मते घेत विजय मिळवला होता. आवसारे यांनी बसपच्या देवांगणा गाढवे यांचा पराभव केला होता.
यावर्षी साकोली मतदारसंघात भाजपच्या परिणय फुके आणि काँग्रेसचे नाना पटोले यांच्यात मुख्य लढत आहे. वंचित आघाडीचे उमेदवार सेवक वाघाये यांचे ही नाव चर्चेत आहे. तुमसरमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजू कारेमोरे आणि भाजपच्या प्रदीप पडोळे यांच्यात चुरस पहायला मिळणार आहे.
भंडाऱ्यातून भाजपचे अरविंद भालाधरे आणि काँग्रेसचे जयदीप कवाडे रिंगणात आहेत.
इतिहास पाहता भंडारा जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व राहिले आहे. यावेळीही आपले वर्चस्व राखण्यात भाजप यशस्वी होणार का? हे पाहणे उत्सुकतेचे आहे.