भंडारा - शेतीच्या कामावर जात असताना अचानक डोंगा उलटल्याने तीन महिलांसह एक बालिका पाण्यात पडल्या. त्यात एका महिलेचा बुडून मृत्यू झाला. तर अन्य तिघे बचावले. ही घटना मंगळवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास भंडारा तालुक्यातील बेरोडी नाल्यावर घडली. सुशिला अरूण राघोर्ते (४२) रा. सुरेवाडा असे मृत महिलेचे नाव आहे.
घटनेची माहिती मिळताच गावकरी पोहचले-
घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेतली आणि बुडालेल्या या महिलेला पाण्यातून बाहेर काढले. तोपर्यंत ती महिला मृत पावलेली होती. कारधा पोलीस ठाण्याचे ठाणेदार वानखेडे, तहसीलदार अक्षय पोयाम यांनी भेट देऊन पंचनामा केला. मृत महिला सुशिला राघोर्ते हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. अधिक तपास कारधा पोलीस करीत आहेत.
गोसेचे चुकीचे नियोजन-
गोसे धरणामुळे किती परिसर भाग धरणग्रस्त होईल. याचे तांत्रिक नियोजन चुकले असल्याने ज्या भागात या धरणाचे पाणी जाणार नव्हते. त्या भागात सुद्धा धरणाचे बॅकवॉटर पोहोचले आहे. या नाल्यापर्यंत बॅक वॉटर आले आहे. मात्र हा परिसर धरणग्रस्त भागात येत नसल्यामुळे या भागातील जमीन अधिग्रहित करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिक त्यांच्या हक्काच्या जमिनीवर पीक घेण्यासाठी दररोज हा जीवघेणा प्रवास करतात. नाल्यावरुन पलिकडे जाण्यासाठी कोणतीही नाव किंवा डोंग्याची सोय नाही. त्यामुळे ये-जा करण्यासाठी गावकऱ्यांनी साहित्यांची जुळवाजुळव करुन स्वनिर्मीत डोंगा तयार केला आहे. प्रशासनाने ये-जा करण्यासाठी पूल किंवा डोंग्याची व्यवस्था न केल्याने ही घटना घडल्याने स्थानिकांमध्ये रोष आहे.
हेही वाचा- प्रवाशांच्या तक्रारींनंतर लोकलच्या वेळेत लवकरच होणार बदल