भंडारा - 8 जानेवारीच्या मध्यरात्री भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये झालेल्या दहा बालकांच्या जळीतकांडाला एक महिना पूर्ण झाला आहे. सुरूवातीला गांभीर्य दाखविणाऱ्या राजकीय लोकांचे, पालकांच्या आणि नागरिकांच्या आता संवेदना बोथट झाल्या आहेत. या घटनेकडे आता सर्वांनीच दुर्लक्ष केले असून प्रशासनाने चौकशीच्या नावाखाली निव्वळ वेळकाढूपणा केला असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
काय झाले त्या रात्री -
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये 8 जानेवारीच्या मध्यरात्री अचानक धावपळ सुरू झाली. बेबी केअर युनिटमध्ये आग लागल्याने या इमारतीमधील इतर रुग्णांना हलविण्यात आले. तर अग्निशमन दलाच्या मदतीने बेबी केअर युनिटमध्ये उपचार घेत असलेल्या 17 बालकांपैकी 7 बालकांना वाचविण्यात आले होते. मात्र, या दुर्दैवी घटनेत दहा निष्पाप बालकांचा नाहक बळी गेला होता.
मुख्यमंत्र्यांसह 13 मंत्रांनी आणि राज्यपालांनी लावली हजेरी -
महाराष्ट्रातील सर्वात मोठी दुर्दैवी घटना असल्याने मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, गृहराज्यमंत्री यासह जवळपास 13 मंत्र्यांनी एवढेच काय, तर राज्यपालांनीही घटनास्थळाला भेट दिली होती. विरोधीपक्ष नेतेही याठिकाणी आले होते. त्यानंतर कारवाई करण्याची मागणी सुरू झाली. शासनाने यावर लगेच उपाय शोधला आणि चौकशी समिती नेमली.
आरोग्य विभागाचा चौकशी अहवाल -
तेराव्या दिवशी आरोग्य विभागाचा चौकशी अहवाल आला. या चौकशी अहवालामध्ये अस्थाई स्वरूपाच्या दोन परिचारिका आणि एका बालरोग तज्ञ डॉक्टरला बडतर्फ केले, तर दोन परिचारिका आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांना निलंबन केले होते. तसेच निवासी वैद्यकीय अधिकारी यांची बदली करण्यात आली होती. त्यामुळे काही प्रमाणात का होईना, आम्ही चौकशी करून कारवाई केली, हे सांगण्यात शासनाला यश आले.
राजकीय पक्षाचे केवळ राजकारण -
या घटनेनंतर विरोधी पक्षातर्फे केवळ राजकारण करण्या आले. दहा दिवस त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले आणि 25 तारखेला विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात एक मोठा मोर्चा काढला, जणू भाजपाला या प्रकरणाची अतिशय गांभीर्य आहे, असे नागरिकांना दाखविण्याचा प्रयत्न विरोधीपक्षातर्फे कऱण्यात आला. तर मुख्यमंत्री आले, मंत्री आले, विरोधी पक्ष नेते आले. विविध चौकशी समिती स्थापन केल्या गेल्या. मात्र, ही घटना नेमकी कशी झाली, याविषयी महिना लोटूनही शासनातर्फे ठोस असे उत्तर मिळत नाही. विरोधक आता शांत झाले. त्यामुळे या सर्व गोष्टी म्हणजे राजकारण आणि वेळकाढूपणा एवढच आहे. या रुग्णालयांमध्ये सर्वसामान्य नागरिकांचे उपचार होतात. राजकीय लोकांचे नाही, त्यामुळे राजकीय लोक मग ते सत्ता पक्षातील असतील किंवा विरोधात असतील, यांना गांभीर्य अजिबात उरलेला नाही, असे आरोप होत आहेत.
संवेदना केवळ 8 दिवसापूर्तीच -
पीडित पालकांना पैसे देऊन शांत केले गेले. चौकशी लावून काही लोकांवर निलंबन आणि बडतर्फीची कारवाई केली गेली. मात्र, आता हा विषय सर्वांसाठी दुर्लक्षित झालेला आहे. घटनेनंतर केवळ आठ दिवस सर्वांच्या संवेदना जागी झाल्या होत्या. मात्र, त्या संवेदना नसून केवळ देखावा होता. आता या सर्वांच्या संवेदना संपल्या आहेत.
हेही वाचा - शिवसेना पूर्वीपेक्षा अधिक बळकट; अमित शाहांना संजय राऊत यांचे प्रत्युत्तर