भंडारा - लाखांदूर पंचायत समितीमध्ये एका वृद्ध दाम्पत्याने बीडीओ कक्षासमोर ठिय्या आंदोलन केले. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधकाम सुरू केलेल्या आपल्या अर्धवट घरकुलाचे उर्वरित पैसे मिळावेत यासाठी त्यांनी हे आंदोलन केले. घरकुल बांधकाम कंत्राटदाराने या दाम्पत्याला येथे आणून सोडले होते. घरकुल बांधकाम यंत्रणेकडून लाभार्थ्यांची देयके तयार आहेत. मात्र, संगणक आणि अन्य यंत्रणेत बिघाड झाल्याने संबंधित लाभार्थ्यांच्या धनादेशाची ऑनलाईन प्रक्रिया झाली नाही, असे सांगण्यात आले यानंतर या वृद्ध दाम्पत्याने ठिय्या आंदोलनाचा निर्णय घेतला.
अनसुया रतिराम बावणे (वय 65) रतिराम पैठण बावणे (वय 75) दोन्ही राहणार नांदेड अशी या वृद्ध पती-पत्नींची नावे आहेत. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत या वृद्ध दाम्पत्याच्या घरकुलाचे काम 2019-20 मध्ये मंजूर झाले होते. या कामासाठी त्यांना याआधी दोन वेळा धनादेश मिळाले होते. या धनादेशांचे माध्यमातून मिळालेल्या पैशातून या वृद्ध दाम्पत्याच्या घरकुलाचे बांधकाम छतापर्यंत पूर्ण झाले. मात्र, पुढील पैसे थकल्याने उर्वरित बांधकाम रखडले आहे. सध्या हे दाम्पत्य गावातील मंदिरातच राहत आहे.
दरम्यान, पैशासाठी लाखांदूर पंचायत समिती प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही धनादेश प्राप्त न झाल्याने घरकुल बांधकाम ठेकेदाराने या वृद्ध लाभार्थी दाम्पत्याला चक्क पंचायत समितीतील व्हिडिओ कक्षात आणले आणि तो तेथून पळून गेला. येथे घरकुल बांधकाम यंत्रणेने या लाभार्थ्यांची देयके तयार केली आहेत. मात्र, संगणक आणि अन्य यंत्रणेत बिघाड झाल्याने त्यांना ऑनलाईन धनादेश मिळण्याची प्रक्रिया झाली नसल्याचे सांगण्यात आले.