भंडारा - मागच्या पाच वर्षात भाजप सरकारने तुमच्या नेतृत्वात काय केले असे जर तुम्ही पंतप्रधानांना विचाराल तर त्यांच्याकडे प्रत्येक प्रश्नाचे एकच उत्तर आहे आणि ते म्हणजे, कलम 370 हटवले.राष्ट्रवादाच्या नावाखाली पंतप्रधान फसवणूक करत आहेत, असा घणाघात अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनी केला आहे. साकोली विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्या प्रचारार्थ साकोली येथील होमगार्ड मैदानात आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.
हेही वाचा - नाना पटोलेंच्या मतदारसंघात मोदींची सभा; लोक म्हणतात...
सिन्हा पुढे म्हणाले, "देशात शेती, रोजगार, उद्योग अशा गंभीर समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्यांच्या नोटबंदी आणि जीएसटी सारख्या निर्णयांमुळे संपूर्ण देशाचे कंबरडे मोडले. मात्र ते याविषयी अजिबात बोलत नाहीत. मोदींनी देशाला गरीब बनवले. ते देशावर आपले निर्णय थोपतात. त्यामुळे भाजपला आता 'खमोश' म्हणण्याची वेळ आली आहे" विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला शेवटचे चार दिवस उरले असताना राज्यात प्रचाराने जोर धरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकत नाहीत. ते हिटलर आहेत, असे म्हणत नाना पटोले यांनी भाजप आणि खासदारकीचा राजीनामा दिला होता. यावेळी प्रचार सभेत बोलताना त्यांनीही भाजपसह मोदींवर निषाणा साधला.