भंडारा - भाजप-सेनेला राष्ट्रवादी भ्रष्टाचारी पक्ष वाटत होता. या पक्षातील नेते भ्रष्टाचारी आहेत, असेही आरोप त्यांनी केले आहेत. आता त्याच पक्षातील लोकांना स्वतःच्या पक्षात फुल-हार देऊन पतितपावन केले जाते का? भाजप-सेना म्हणजे पतित पावन करणारे तीर्थक्षेत्र झाले आहे का? असा सवाल राष्ट्रवादी युवती काँग्रेस प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी केला. गेल्या १३ जुलैपासून त्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. आज भंडाऱयात आल्या असता सचिन अहिर यांच्या सेनाप्रवेशाबाबत त्या बोलत होत्या.
राष्ट्रवादीत असताना लोक भ्रष्टाचारी असतात. भाजप-सेनेत गेल्यानंतर ते पूर्णपणे शुद्ध होतात, असा गैरसमज भाजप आणि सेना पसरवत आहे. भाजप-सेनेमध्ये सक्षम नेतृत्व नसल्याने राष्ट्रवादीच्या सक्षम नेत्यांना आपल्या पक्षात घेऊन त्यांना तिकीट देण्याचे काम केले जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच या दोन्ही पक्षात कार्य करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना भविष्यात केवळ सतरंजी उचलण्याचे काम करावे लागणार असल्याची खोचक टीका सलगर यांनी केली.
राज्यात महिला असुरक्षित; रक्षाबंधानाला मुख्यमंत्र्यांना पाठवणार साडीचोळी अन् बांगड्या -
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात महिला असुरक्षित आहेत. महाराष्ट्राची उपराजधानी असलेले नागपूर क्राइम कॅपिटल म्हणून ओळखले जात आहे. त्यामुळे या राज्यात महिला, तरुणी आणि नागरिक सुरक्षीत नाही, असे सलगर म्हणाल्या. तसेच अशा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना या रक्षाबंधनाला साडीचोळी आणि बांगड्या पाठवणार असल्याचे सलगर यांनी सांगितले.
सलगर यांनी विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन तेथील तरुणींशी, महिलांशी चर्चा करून सध्याची परिस्थिती जाणून घेतली. भाजप सरकार केवळ सत्तेसाठी धावपळ करीत आहे. तरुणांचे शिक्षण, रोजगार याकडे शासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील सलगर यांनी यावेळी केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः गृहमंत्री असूनही नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात महिला असुरक्षीत आहेत. नागरिक असुरक्षीत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अपयशी ठरले असल्याचे सलगर म्हणाल्या.